Rahul Gandhi slams PM Modi in US: लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ठिकठिकाणी ते भारतीय समुदायातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नुकतेच त्यांनी व्हर्जिनिया मधील हेरंडन येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकास्र सोडले. भाजपा आणि पंतप्रधान मोदींनी छोट्या व्यावसायिकांवर यंत्रणेच्या माध्यमातून भीती आणि दबाव आणला होता. मात्र काही सेकंदात ही भीती आता निघून गेली आहे. २०२४ चे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच त्यांची भीती नाहीशी झाली.
“लोकसभेच्या निवडणुकीनंतर निश्चित काहीतरी बदल झाला आहे. लोक आता म्हणतात की, आम्हाला भीती नाही वाटत. आमची भीती निघून गेली. भाजपा आणि पंतप्रधान मोदींनी यंत्रणेच्या माध्यमांतून छोट्या व्यावसायिकांवर दहशत बसवली होती, लोकसभेच्या निकालानंतर काही सेकदांत भीतीचे सावट दूर झाले. ही दहशत बसविण्यासाठी यांनी अनेक वर्ष काम केले, मात्र ती नाहीशी होण्यासाठी काही सेकंद पुरेसे ठरले”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
हे वाचा >> Rahul Gandhi in US: राहुल गांधींचा अमेरिकेत भाजपा व संघावर हल्लाबोल; म्हणाले, “आरएसएसला वाटतंय की…”
राहुल गांधी काय म्हणाले ऐका?
५६ इंचाची छाती, थेट देवाशी संबंध आता उरला नाही
राहुल गांधी पुढे म्हणाले, “संसदेत आता मी जेव्हा पंतप्रधान मोदींना पाहतो. तेव्हा त्यांची ५६ इंचाच्या छातीचा दावा, थेट देवाशी संबंध असल्याची कल्पना मला कुठेही दिसत नाही. हे सर्व दावे आता इतिहास जमा झाले आहेत.” व्हर्जिनिया येथील कार्यक्रमानंतर राहुल गांधींनी जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर ते दोन दिवसांच्या वॉशिंग्टन दौऱ्यासाठी निघाले.
भाजपाला अजून हे कळलेले नाही की, हा देश प्रत्येकाचा आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे. संविधानातही हे स्पष्टपणे नमूद केले आहे. भारतात वेगवेगळा इतिहास, संस्कृती, संगीत आणि नृत्यांचा समावेश आहे. मात्र ते (भाजपा) एकसंघ नसून वेगळेच आहेत, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल भारतीय लोकशाहीवर कलंक – भाजपा
राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपने तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले. राहुल हे भारतीय लोकशाहीतील काळा डाग असल्याची टीका भाजपने केली. काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार परदेशात आपल्या वक्तव्याने भारतीय लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला. राहुल गांधी हे अपरिपक्व आणि अर्धवेळ नेते असल्याच्या टीकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.