scorecardresearch

‘तुरुंगात टाकले तरीही प्रश्न विचारणार’

बडतर्फीचा सगळा खेळ मी मोदी-अदानींसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी खेळला गेला.

Rahul Gandhi
राहुल गांधी

नवी दिल्ली : मला कायमस्वरूपी बडतर्फ केले, तुरुंगात डांबले तरी चालेल, पण मी मोदी-अदानींना प्रश्न विचारणारच. मी सावरकर नाही, गांधी आहे. गांधी माफी मागत नाहीत, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, शनिवारी पत्रकार परिषदेत घेतला.

अदानींच्या बेनामी कंपन्यांमधील २० हजार कोटी कोणाचे आहेत, हा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यावर टीका केली. ‘‘लोकसभेतील पुढील भाषणात मी काय बोलेन, याची मोदींना भीती वाटू लागली होती. मी अदानींवर बोलेन हे त्यांना माहिती होते, तशी भीती त्यांच्या डोळय़ांत दिसत होती. त्यामुळे सैरभैर होऊन त्यांनी मला बडतर्फ केले’’, अशी टीका राहुल गांधींनी केली. बडतर्फीचा सगळा खेळ मी मोदी-अदानींसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी खेळला गेला. मोदींना वाचवण्यासाठी माझ्याविरोधात हे नाटय़ घडवून आणले गेले, असा आरोपही त्यांनी केला.

देशातील लोकशाही संपुष्टात आली आहे. लोक मोकळेपणाने बोलू शकत नाहीत, घटनात्मक संस्था ताब्यात घेतल्या जात आहेत, असा आरोप करून राहुल म्हणाले की, मी लोकशाही वाचवण्यासाठी अविरत लढेन. माझा मार्ग सत्याचा आहे. सत्य माझ्या रक्तात आहे. राजकारणामध्ये सत्य बोलणे फॅशनेबल नसेल, पण सत्याचा ध्यास ही माझी तपस्या आहे!

काँग्रेसच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित होते. अदानींच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी गुंतवले असतील तर त्यांना तुरुंगात टाका, असेही राहुल गांधी म्हणाले.

भाजपविरोधात हत्यार मिळाले!

भाजपविरोधात लढण्याच्या विरोधकांच्या क्षमतेवर परिणाम होईल याची चिंता वाटते का, या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, ‘‘अपात्र ठरवून भाजपने मला सर्वात मोठी भेट दिली आहे. मला बडतर्फ करून भाजपविरोधात लढण्याचे हत्यार त्यांनी विरोधकांच्या हाती दिले आहे. त्याचा फायदा विरोधी पक्षांना होईल. विरोधी पक्षांनी दिलेल्या पािठब्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आम्ही एकत्र भाजपविरोधात लढू.’’ राजकीय पक्षांना पूर्वी प्रसारमाध्यमे, अन्य संस्थांकडून पाठबळ मिळत असे. आता ते मिळत नसल्याने विरोधकांकडे लोकांमध्ये जाण्याचा एकमेव पर्याय उरला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

सपशेल खोटे आरोप

लंडनमधील भाषणामध्ये मी देशातील लोकशाही वाचवण्यासाठी परराष्ट्रांनी मदत करावी असे एकदाही बोललो नाही. भारताचे प्रश्न देशातील लोक सोडवतील, असे मी म्हणालो. तरीही भाजपच्या खासदारांनी संसदेत सपशेल खोटे आरोप केले. आधी लक्ष विचलीत करायचे, नंतर बडतर्फ करायचे, हे ठरवून केले गेले, असे राहुल गांधी म्हणाले.

लोकसभाध्यक्ष म्हणाले, चहा प्यायला या!

माझ्यावर आरोप झाले तर मला स्पष्टीकरणाची संधी मिळायला हवी होती. मी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना दोन पत्रे लिहूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मग, मी त्यांची भेट घेतली. पण, लोकसभाध्यक्षांनी मला लोकसभेत बोलू देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यापेक्षा माझ्याबरोबर चहा प्या, असे ते म्हणाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

मुद्दा ओबीसींचा नव्हेच

भारत जोडो यात्रेमध्ये मी सांगितले होते की, सर्व समाज एक आहेत. एकमेकांमध्ये बंधुभाव ठेवा, हिंसा-द्वेष करू नका. मी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली होती. माझ्या विधानांचा ओबीसींशी काहीही संबंध नाही. मोदी-अदानींच्या नात्यांचा मुद्दा आहे. अदानींनी पैसे आणले कुठून, हे मी विचारत आहे. या प्रमुख मुद्दय़ापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी कधी ओबीसी, कधी परदेशी केलेल्या विधानांचा मुद्दा चर्चेत आणला जात असल्याचे स्पष्टीकरण राहुल गांधींनी दिले.

राहुल गांधींचे प्रश्न

० अदानींच्या बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत?

० या कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत?

० या कंपन्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित असूनही संरक्षण मंत्रालय प्रश्न का विचारत नाही?

० या कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये चिनी नागरिकाचा समावेश असताना सरकार आक्षेप का घेत नाही?

भाजपने आरोप फेटाळले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानींसदर्भातील प्रश्नांची भीती वाटत असल्यानेच मला अपात्र ठरवण्यात आले या राहुल गांधी यांच्या आरोपाचे भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी खंडन केले. अदानींविषयीचे प्रश्न आणि राहुल गांधी प्रकरणाचा काहीही संबंध नाही, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लाभ उठवण्यासाठीच गुजरात न्यायालयाच्या निकालाला स्थगितीची मागणी काँग्रेसने केली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 02:49 IST

संबंधित बातम्या