जिथे मोदींची सभा, तेथेच राहुल यांचाही प्रचार

धुळे, वर्ध्यापाठोपाठ या आठवडय़ात दोघांच्या राज्यात सभा

धुळे, वर्ध्यापाठोपाठ या आठवडय़ात दोघांच्या राज्यात सभा

भाजप व काँग्रेसच्या नेतृत्वाने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुका जाहीर व्हायच्या आधीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या भागांत सभा घेऊन प्रचाराचा धुरळा उडविला आहे. विशेष म्हणजे जिथे मोदी यांची सभा होईल, तिथेच राहुल गांधी सभा घेऊन शक्तिप्रदर्शन करीत आहेत.

धुळे, वर्ध्यानंतर पुढील आठवडय़ात मराठवाडय़ात मोदी व राहुल यांच्या एकापाठोपाठ सभा होणार आहेत.  राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या विविध विकास योजनांच्या शुभारंभ कार्यक्रमाचे निमित्त करून पंतप्रधान मोदी यांचा फेब्रुवारीमध्ये धुळे येथे दौरा आयोजित करण्यात आला होता.  त्यानंतर काही दिवसांतच म्हणजे १ मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा धुळे व मुंबई असा दौरा आयोजित करण्यात आला. त्या वेळी धुळे येथे ज्या ठिकाणी मोदी यांची सभा झाली, त्याच ठिकाणी राहुल यांची सभा घेऊन काँग्रेसनेही शक्तिप्रदर्शन केले. त्याच दिवशी मुंबईतही त्यांची सभा झाली.

राज्यात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला  सात मतदारसंघांत मतदान होत आहेत. मोदी यांनी वर्धा, नागपूर व गोंदियामध्ये सभा घेतल्या. १ एप्रिलला वर्धा येथे पंतप्रधानांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्याच ठिकाणी राहुल गांधी यांची ६ एप्रिलला सभा झाली.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील तीन म्हणजे बुलढाणा, अकोला व अमरावती आणि मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर या सहा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, अशा एकूण दहा मतदारसंघांत १८ एप्रिलला मतदान होणार आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी व राहुल यांच्या सभा होणार आहेत. त्यापैकी ९ एप्रिलला पंतप्रधानांची औसा येथे सभा होणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत त्याच ठिकाणी राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rahul gandhi narendra modi