‘‘भारतीय अर्थव्यवस्था मृत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाच माहीत नाही. त्यांच्याशिवाय सर्वांनाच हे माहीत आहे. कारण भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाची आर्थिक, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणे उद्ध्वस्त केली आहेत,’’ अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी अमेरिकेशी लवकरच व्यापार करार होईल, असा दावा केला. हा व्यापार करार ट्रम्प परिभाषित करतील, तर पंतप्रधान मोदी अमेरिकी अध्यक्ष जे सांगतील तेच करतील, असे राहुल गांधी म्हणाले.
ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयातशुल्क आणि दंड लादण्याची घोषणा केल्यानंतर भारत आणि रशियाला ‘मृत अर्थव्यवस्था’ असे संबोधले. त्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. ‘‘अमेरिकी अध्यक्ष बरोबर बोलतात. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांशिवाय सर्वांनाच भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याचे माहीत आहे. ट्रम्प यांनी वस्तुस्थिती सांगितली याचा मला आनंद आहे,’’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. तुम्ही कशा प्रकारे देश चालवत आहात? देश कसा चालवायचा हेच तुम्हाला माहीत नाही, अशी टीका गांधी यांनी केली.
अदानी-मोदी संबंधांवर टीका
अब्जाधीश उद्याोगपती गौतम अदानी यांना मदत करण्यासाठी भाजपने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भाजप सरकार देशाला जमिनीत ढकलत आहेत. पंतप्रधान फक्त एकाच व्यक्तीसाठी काम करतात- अदानी. सर्व छोटे व्यवसाय नष्ट झाले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.