आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. करोनाचं सावट असलं तरी प्रजाकसत्ताक दिनाचा उत्साह मात्र कायम आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक नेत्यांनी आणि कलाकारांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही ट्वीट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना त्यांनी अमर जवान ज्योतीचा फोटो ट्वीट केलाय.  

“१९५० मध्ये प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाने आत्मविश्वासाने योग्य दिशेने पहिले पाऊल टाकले होते. सत्य आणि समतेच्या त्या पहिल्या पावलाला सलाम. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!,” अशा लिहत त्यांनी अमर जवान ज्योतचा फोटो ट्वीट केलाय.

दरम्यान, नवी दिल्लीतील इंडिया गेटवर गेली ५० वर्षे जळत असलेली अमर जवान ज्योती शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जळणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राहुल गांधींनी टीका केली होती. “आमच्या शूर जवानांसाठी जी अमर ज्योती जळत होती, ती विझवली जाईल हे खूप दुःखद आहे. काही लोक देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाही, हरकत नाही. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योती पुन्हा एकदा पेटवू!”, असं राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं होतं.

अमर जवान ज्योतीचा इतिहास..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली होती. या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले, जिथे २५,९४२ सैनिकांची नावे लिहिली गेली आहेत.