Rajnath Singh at SCO meet: चीनमधील किंगदाओ शहरात होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसमोरच दहशतवादाबद्दल खडे बोल सुनावले. काही देश सीमेपलीकडील दहशतवादाला प्रोत्साहन देत असून दहशतवाद्यांना थारा देत आहेत, असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते.
काही देश सीमेपलीकडील दहशतवादाचा वापर धोरण म्हणून करत असून दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत. अशा दुटप्पी भूमिका ठेवणाऱ्यांना कोणतेही स्थान देण्यात येऊ नये. एससीओने अशा राष्ट्रांवर टीका करण्यास मागेपुढे पाहू नये, असे विधान राजनाथ सिंह यांनी गुरुवारी शिखर परिषदेला संबोधित करताना म्हटले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “भारत आपल्या कृतीमधून दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे आज तुम्हाला दिसेल. दहशतवाद्यांपासून आमच्या देशाचे संरक्षण करणे, हा आमचा अधिकार आहे. दहशतवाद्यांचे तळ आता सुरक्षित नाहीत आणि त्याला उध्वस्त करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाहीत, हे आम्ही दाखवून दिले आहे.”
तरूणांमध्ये कट्टरतावादाचा प्रसार रोखण्यासाठी आपण सक्रिय पावले उचलली पाहिजेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या रॅट्सने यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताकडे अध्यक्षपद असताना आम्ही ‘दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीपणाकडे नेणाऱ्या कट्टरतावादाचा मुकाबला’ या विषयावर एससीओ राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेचे संयुक्त निवेदन दिले होते.
शिखर परिषदेत बोलत असताना राजनाथ सिंह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताने कशाप्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवत लष्करी करवाई केली, याची माहिती त्यांनी दिली.
पहलगाम हल्ल्यावरून सुनावलं
राजनाथ सिंह म्हणाले, पहलगाम हल्ल्याची पद्धत पाहिली तर लष्कर-ए-तोयबाच्या मागील दहशतवादी हल्ल्यांशी ती जुळते. दहशतवादापासून बचाव करण्याचा आणि सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले रोखण्याचा अधिकार वापरून भारताने ७ मे २०२५ रोजी सीमेपलीकडे असलेले दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवले.
२०२० साली पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) लष्करी तणावानंतर संबंध ताणले गेल्यानंतर भारतातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा हा पहिलाच चीन दौरा होता. भारत २०१७ साली शांघाय सहकार्य संघटनेचा (SCO) पूर्णकालीन सदस्य बनला. २०२३ साली भारताने संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले. २००१ साली स्थापन झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेत कझाकस्तान, चीन, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकीस्तान, इराण आणि बेलारूस यांचा समावेश आहे.