देशात काँग्रेस अध्यपदाच्या निवडणुकीला वेग आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार आहे. मात्र, अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ सचिन पायलट यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्यात आता गेलहोत यांच्या जवळच्या आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस समोर नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक होणार होती. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्याच्या नावावर चर्चा केली जाणार होती. यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना निरीक्षक आणि प्रभारी म्हणून पाठवलं आहे.

९२ आमदारांचा राजीनामा देण्याचा इशारा

मात्र, या बैठकीपूर्वी गेहलोत गटाच्या काँग्रेस आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सचिन पायलट यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. तसेच, अशोक गेहलोत हेच मुख्यमंत्री रहावे, अशी काँग्रेस आमदारांची इच्छा आहे. अथवा गेहलोत गटातील व्यक्तीला मुख्यमंत्री करावे, अशी आमदारांची मागणी आहे. अन्यथा ९२ आमदारांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांची भेटही घेतली आहे.

हेही वाचा – “आपण आत्महत्या करायची नाही, पण…” भाजपावर टीका करताना शरद पवारांचं विधान

“अशोक गेहलोत कसे निर्णय घेऊ शकतात”

याबाबत अधिक माहिती देताना काँग्रेस नेते प्रताप सिंग खाचरियावास यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, सर्व आमदार संतापले असून ते राजीनामा देणार आहेत. आम्ही विधानसभा सभापतीच्या घरी जात आहोत. कोणतीही चर्चा न करता मुख्यमंत्री अशोक गेहलोत स्वत: निर्णय कसे काय घेऊ शकतात, यामुळे सर्व आमदार नाराज आहेत.

हेही वाचा – ‘भारत विकसनशील देशांचा प्रातिनिधिक आवाज’; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे मत

आमदारांशी चर्चा करण्याचे सोनिया गांधींचे निर्देश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी अशोक गेहलोत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थिती हातळण्याची विनंती केली. त्यावर आमदार ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे गेहलोत यांच्याकडून सांगण्यात आलं. तर, दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आमदारांशी चर्चा करण्याचे निर्देश मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राजस्थानमध्ये काँग्रेसचे १०७ आमदार आहे. यामधील ९२ आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर, सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ केवळ १० आमदार असल्याची चर्चा आहे.