राजस्थानमधल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाची शान आणि या जंगलाची राणी म्हणून ओळखल्या जाणा-या ‘मछली’ वाघिणीचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून ही वाघिण आजारी होती. तर पाच दिवसांपासून तिने काही खाल्ले देखील नव्हते. संपूर्ण जंगलावर राज्य करणारी ही राणी गेल्या काही दिवसांपासून आमा घाट परिसरात पडून असायची. तिच्यावर या काळात उपचारही सुरू होते परंतु या उपचारांना यश आले नाही. गुरूवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.  रणथंबोरच्या जंगलात या वाघिणीला विषेश मान होता कारण या जंगलात येणारा पर्यटक फक्त आणि फक्त ‘मछली’ला पाहण्यासाठी येथे यायचा. तिच्या वास्तव्यामुळे रणथंबोरला आर्थिक दृष्ट्या फायदा देखील झाला होता, अनेक परदेशी पर्यटक देखील तिच्यासाठी यायचे त्यामुळे केवळ मचछीमुळे परदेशी चलन देखील रणथंबोरला मिळाले होते. गेल्या दहा वर्षांत केवळ मछलीमुळे रणथंबोरला ६७ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. या वाघिणीच्या चेह-यावर असलेल्या माशांसारख्या आकारामुळे तिला मछली हे नाव देण्यात आले. मछलीच दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तिचे वय. साधरण वाघ हे पंधरा वर्षांच्या आसपास जगतात पण मछली ही १९ वर्षांपर्यंत जगली. तसेच आतापर्यंत क्वचित इतक्या वाघाचे कोणी फोटो काढले असतील इतके फोटो मछलीचे काढण्यात आले होते. त्यामुळे सर्वाधिक फोटो काढण्याचा विक्रमही तिच्या नावे होता. रणथंबोरची राणी आणि एखाद्या सेलिब्रीटीप्रमाणे प्रसिद्धी लाभलेल्या मछलीच्या जाण्याने अनेक प्राणीप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. तर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी देखील तिच्या जाण्याने दुख व्यक्त केले.