Asaram Bapu Rape Case Latest Updates: एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसाराम बापूला ३१ मार्च पर्यंत अंतरीम जामीन मंजूर झाला आहे, पण या काळात त्यांना आल्या अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

आसाराम बापूला हृदयाशी संबंधित आजार आहे. याआधी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. अंतरिम जामीन देत असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जेणेकरून त्यांच्यावर देखरेख ठेवता येईल.

१८ डिसेंबर रोजीच सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला १८ दिवसांचा पॅरोल दिला होता. १ जानेवारी रोजी जोधपूर कारागृहात परतल्यानंतर आता पुन्हा एकदा अंतरिम जामीन देण्यात आला आहे.

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वैद्यकीय उपचारांसाठी राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला सात दिवसांचा पॅरोल दिला होता.

गांधीनगर सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये आसाराम बापू या नावाने प्रसिद्ध असलेल्या आसुमल हरपलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एका बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकेकाळी देशातील एक शक्तिशाली व्यक्ती असलेल्या आसाराम बापूचा अस्त झाला. बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा होती. यापूर्वी, एप्रिल २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. २०१३ मध्ये आसाराम बापूवर जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हे वाचा >> पंतप्रधान मोदी ते अटलबिहारी वाजपेयी: लाखो अनुयायी असलेल्या आसाराम बापूच्या साम्राज्याला उतरती कळा कशी लागली?

बलात्काराचे गुन्हे दाखल होण्यापूर्वी आसाराम बापू लोकप्रिय धर्मगुरू होते. १९७० च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर त्याने पहिला आश्रम सुरू केला होता. त्यानंतर आसाराम बापूने संपूर्ण देशभरात कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. त्याच्या आश्रमातील विविध उत्पादनांना आणि आध्यात्मिक साहित्यांना देशभरात प्रचंड मागणी होती. त्याच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय वर्तुळातही आसाराम बापूचे अनेक अनुयायी होते. आसाराम बापूची लोकप्रियता शिखरावर असताना त्यांच्यासोबत दिसलेल्या काही राजकीय नेत्यांमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे.