RCB Victory Parade Bengaluru Stampede: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं आयपीएल विजेतेपद मिळवल्यानंतर कर्नाटकमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. हाच जल्लोष साजरा करण्यासाठी आणि आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी ५ जून रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा आपला जीव गमवावा लागला, तर ३३ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर राजकीय, तसेच क्रीडा विश्वातूनही हळहळ व्यक्त होत असताना मृतांना नेण्यात आलेल्या रुग्णालयांत विदारक दृश्यं दिसत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

चेंगराचेंगरीतील मृत व जखमींना नेण्यात आलेलं बंगळुरूतलं एक रुग्णालय म्हणजे बॉवरिंग हॉस्पिटल. बुधवारी रात्री रुग्णालयाच्या शवागाराबाहेर मृतांच्या नातेवाईकांनी फोडलेला टाहो तिथे असणाऱ्या प्रत्येकाचंच काळीज पिळवटून टाकत होता. या चेंगराचेंगरीत मनोज कुमार नावाचा एक १८ वर्षांचा महाविद्यालयीन तरुण मृत्यूमुखी पडला. मनोजचे वडील पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करतात. “त्याला कॉलेजमध्ये जायला मिळावं म्हणून मी त्याला दुकानावर प्लेट धुवायलाही सांगत नव्हतो. मी जिवाचं रान करून त्याला वाढवलं. पण आता तो निघून गेला आहे”, असं सांगताना मनोजच्या वडिलांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.

मनोज कुमार प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या बालपणीच्या तीन मित्रांसोबत तो स्टेडियमवर आपल्या विजेत्या संघाला पाहायला गेला होता. “मनोजनंच आम्हाला स्टेडियमवर जाण्याचा आग्रह केला”, असं त्याचा मित्र सात्विक सांगत होता.

bengaluru stampede
बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीपूर्वी झालेली प्रचंड वाहतूक कोंडी (फोटो – पीटीआय)

“आरसीबीच्या जर्सीतच माझ्या मुलाचा मृत्यू झाला”

वैदेही रुग्णालयातलं चित्रही फारसं वेगळं नव्हतं. तिथे शवागाराबाहेर एक आई आपल्या अवघ्या २२ वर्षांच्या तरुण मुलाच्या मृत्यूवर आसवं गाळत होती. प्रज्वल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. “तो आरसीबीचा प्रचंड मोठा चाहता होता. आरसीबीच्याच जर्सीमध्ये त्याचा मृत्यू झाला. आरसीबीनं विजेतेपद पटकावलं तेव्हा त्या सगळ्यांनी नाचून आनंद साजरा केला. पण आता तो कायमचा निघून गेला आहे. आरसीबी माझा मुलगा परत करू शकणार आहे का?” असा मन हेलावून टाकणारा सवाल ही आई करत होती.

एमडी हुसेन नावाच्या तरुणानं केली मदत

प्रत्यक्ष चेंगराचेंगरीची घटना घडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या एम. डी. हुसेन नावाच्या २४ वर्षीय तरुणानं अनेकांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. हुसेन सांगतो, “जवळपास ३.३५ च्या सुमारास तासाभरापासून गेट क्रमांक २० जवळ वाट पाहात असणारी गर्दी बेभान झाली. ते गेट फक्त तपासणीसाठी काहीसं उघडलं जाताच एक मोठा लोंढा आत जाण्यासाठी ढकलाढकली करू लागला. त्यावेळी तिथे फक्त तीन पोलीस कर्मचारी आणि स्टेडियमचे काही सुरक्षारक्षक होते”.

chinnaswamy stadium stampede
बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेली प्रचंड गर्दी (फोटो – जितेंद्र एम/इंडियन एक्स्प्रेस) ो)

एमबीएचं शिक्षण घेणारा हुसेन पुढे सांगतो, “जे कुणी मृत्यूमुखी पडले किंवा जखमी झाले आहेत, ते सगळे स्टेडियममध्ये जाण्याच्या प्रयत्नात खाली पडल्यामुळे अडकले. एक जमाव पोलीस बॅरिकेट्स ओलांडून स्टेडियममध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच मनोज कुमारचा पाय बॅरिकेट्समध्ये अडकला आणि तो पडला. त्यासरशी त्याच्यावर जवळपास ५०० जण अडखळून पडले. पोलिसांच्या मदतीने त्याला तिथून बाहेर काढण्यासाठी आम्हाला मोठ्या जमावाशी दोन तास अक्षरश: लढावं लागलं. बाहेर पडल्यानंतरही रुग्णालयात पोहोचायला आणखी एक तास गेला”, असा धक्कादायक अनुभव हुसेननं सांगितला.

रुग्णवाहिका पोहोचूच शकत नव्हत्या…

दरम्यान, गेट क्रमांक १४ वरील परिस्थिती सांगणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनं धक्कादायक बाब समोर आणली. “त्या गेटजवळून किमान तीन जणांना पोलीस जीपमध्ये नेण्यात आलं होतं. त्या तिघांचाही मृत्यू झाला. सगळे रस्ते गर्दीमुळे बंद झाले होते. रुग्णवाहिका तिथे पोहोचूच शकत नव्हती”, असं त्याने सांगितलं.

१४ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू

बंगळुरूच्या कन्नुरूमध्ये राहणारी १४ वर्षांची दिव्यांशी तिच्या कुटुंबीयांसोबत आपल्या आवडत्या संघाला पाहायला आली होती. चेंगराचेंगरीत तिला आपला जीव गमवावा लागला. “स्टेडियमवर पोलीस नव्हतेच. सीपीआर किंवा कोणताही वैद्यकीय उपचार देण्यासाठी तिथे कुणीही उपस्थित नव्हतं. आम्ही तिला कारमध्ये ठेवलं आणि रुग्णालयात घेऊन गेलो. मुख्यमंत्री जेव्हा आले तेव्हा खूप सारा पोलीस फौजफाटा तैनात होता. पण स्टेडियमवर मात्र एकही पोलीस नव्हता”, अशा शब्दांत दिव्यांशीच्या मावशीने स्टेडियमची परिस्थिती कथन केली.

२९ वर्षांची देवी बंगळुरूत एका खासगी कंपनीत नोकरीला होती. बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर देवी एकटीच गेली होती. बॉवरिंग रुग्णालयाच्या शवागाराबाहेर तिच्या कुटुंबीयांची वाट पाहात उभा असलेला तिचा मित्र दैविक सांगत होता. “चेंगराचेंगरीचं वृत्त समजताच आम्ही तिला अनेकदा फोन केले. पण तिने उचललाच नाही. नंतर काही वेळाने कुणीतरी फोन उचलून सांगितलं की तिला रुग्णालयात नेलंय”, असं दैविकनं सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच ठरलं होतं लग्न!

२५ वर्षांच्या पूर्णा चंद्राचं काही दिवसांपूर्वीच लग्न ठरलं होतं. “सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आम्ही पाहिलं की लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही त्याच्या कुटुंबीयांना कळवलं”, अशी व्यथा पूर्णाच्या एका मित्रानं बॉवरिंग रुग्णालयात सांगितली. त्याचा मृतदेह शोधण्यासाठी तो रुग्णालयांमध्ये चौकशी करत होता. शेवटी वैदेही रुग्णालयात पूर्णाचा मृतदेह सापडला. चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेली २१ वर्षांची सुहाना तर काही दिवसांपूर्वीच एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला लागली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनास्थळी बचावकार्य करणारा हुसेन म्हणतो, “हा कार्यक्रम एखाद्या बंदिस्त ठिकाणी नंतरही करता आला असता. तिथे कमी लोकांना आमंत्रित करता आलं असतं”! आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “हा बीसीसीआयचा कार्यक्रम नव्हता. त्यामुळे यासंदर्भात जी काही चौकशी करावी लागेल, ती संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून होईल. पण ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे”, असं ते म्हणाले.