जम्मू- काश्मीरमध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेली शस्त्रसंधी अंतिम टप्प्यात असतानाच गुरुवारी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक शुजात बुखारी यांची हत्या झाली. ते ५० वर्षांचे होते. गुरुवारी कार्यालयातून घरी परतत असताना मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. जम्मू- काश्मीरमध्ये १५ वर्षांनी दहशतवाद्यांनी पत्रकाराची हत्या केल्याची घटना घडली आहे.

शुजात बुखारी हे कोण आहेत याचा घेतलेला हा आढावा… 

> शुजात बुखारी हे श्रीनगरमधील ‘रायझिंग काश्मीर’चे संपादक होते. त्यापूर्वी ते ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राचे श्रीनगरमधील ब्यूरो चिफ होते.

> काश्मीरच्या शांतता प्रक्रियेसाठी शुजात नेहमीच आग्रही असायचे.

> काश्मीरचा प्रश्न शांततेने सुटेल, अशी त्यांची भूमिका होती. केंद्र सरकारने रमझाननिमित्त जाहीर केलेल्या शस्त्रसंधीचेही त्यांनी स्वागत केले होते.

> काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे होणारे उल्लंघनाबाबतही त्यांनी आवाज उठवला होता.

> शुजात बुखारी यांचे बंधू सय्यद बशरत बुखारी हे मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये कायदा मंत्री आहेत.

> बुखारी यांनी मनिलातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले.

> बुखारी यांना वर्ल्ड प्रेस इन्स्टिट्यूट फेलोशिप, अमेरिका आणि एशियन सेंटर फॉर जर्नालिझम, सिंगापूरची फेलोशिप मिळाली होती.

> काश्मीरमध्ये त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळही सुरु केली होती. काश्मीरमध्ये त्यांचा नावलौकिक होता.