रामदास आठवले यांनी भारत जोडो यात्रेवरुन राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इंदू मिलच्या जागेची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. काँग्रेसच्या काळात ती मागणी पूर्ण झाली नाही. सध्या लोकांची दिशाभूल करणं, लोकांमध्ये फूट पाडणं, भारत तोडोचं काम करणारे आता भारत जोडायला निघाले आहेत अशा शब्दांत रामदास आठवलेंनी राहुल गांधी यांच्यावर आणि काँग्रेसवर टीका केली आहे. मला लोकसभेसाठी जागा मिळाली नाही पण मी महायुतीबरोबरच आहे असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपला देश प्रगती करतो आहे. इंडिया आघाडीचे लोक म्हणत आहेत मोदी पुन्हा निवडून आले तर देशाचं संविधान बदलतील. पण मोदी असं अजिबात करणार नाही. देश कुणी तोडू शकत नाही. राहुल गांधींवर आता भारत जोडो यात्रा काढायची वेळ आली आहे. तुमच्या कार्यकाळात तुम्ही भारत का जोडला नाही? त्यामुळे तुमच्यावर आज ही वेळ आली आहे. राहुल गांधी, काँग्रेस यांनी कायम देश तोडण्याचं काम केलं आहे. आता ते देश जोडायला निघाले आहेत.” असा टोला रामदास आठवलेंनी लगावला आहे. माझा कट्टा या एबीपी माझावरच्या मुलाखतीत रामदास आठवलेंनी हे भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी देणार होते, पण एकनाथ शिंदे..”

रिझर्व्ह बँकेबाबत काय म्हणाले आठवले?

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरबीआयची संकल्पना मांडली होती. १ एप्रिल रोजी स्थापन झालेल्या आरबीआयला आज ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. मी लोकसभेतला माणूस आहे. १९९८ मध्ये मी मुंबईत निवडून आलो होतो. तसंच १९९९ आणि २००४ मध्ये मी शिर्डीतून निवडून आलो होतो. २००९ मला पाडण्यात आलं कारण तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली नाही.” असंही आठवलेंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर सत्तेत नसलो तरीही कार्यकर्ते कायमच माझ्या बरोबर आहेत असंही आठवलेंनी म्हटलं आहे.