उदयपूर आणि अमरावती येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजस्थानमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. राजस्थानमधील झूनझून येथे ही बैठक पार पडेल. गुरूवारपासून (७ जुलै) तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत उदयपूर आणि अमरावती घटनेसंदर्भात सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत मुस्लीम राष्ट्रीय मंचही कन्हैया लाल यांना श्रद्धांजली वाहणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले संपूर्ण लक्ष राजस्थानवर केंद्रीत केले आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सहकार्यवाहक दत्तात्रय होसबोले आणि इतर ४५ झोनचे प्रचारक उपस्थित राहणार आहेत.

उदयपूर येथील टेलर कन्हैय्या लाल यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याचाच राग मनात धरून आरोपी मोहम्मद रियाझ आणि घौस मोहम्मद यांनी २८ जून रोजी कन्हैय्या लाल यांची निर्घृण हत्या केली. तसेच आरोपींनी हत्या करतानाचा व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

अशीच एक घटना अमरावतीतही घडली होती. औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये येत्या काही दिवसांत निवडणुका होणार आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.