हिंदूंवरील हल्ले सुनियोजित असल्याचा आरोप; संयुक्त राष्ट्रांच्या मौनावर टीका 

नवी दिल्ली : बांगलादेशामध्ये दुगरेत्सवाच्या काळात हिंदूंवर झालेले हल्ले सुनियोजित असून केंद्र सरकारने या शेजारी राष्ट्राला सज्जड समज द्यावी, असा ठराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धारवाडमधील बैठकीत संमत करण्यात आला.

हिंदूंवरील हल्लेखोरांविरोधात बांगलादेशी सरकारने कठोर कारवाई करावी आणि हे हल्ले थांबवावेत. बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाला नष्ट करण्याचा हा डाव आहे. त्यासाठी बनावट वृत्तांच्या आधारे धार्मिक तेढ वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. हा चिंतेचा विषय असून केंद्र सरकारने द्विपक्षीय चर्चेच्या सर्व मार्गाचा अवलंब करावा, असा प्रस्ताव संघाच्या बैठकीत चर्चिला गेल्याची माहिती संघाच्या वतीने शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. बांगलादेशात अल्पसंख्य समाजावर अत्याचार होत असताना संयुक्त राष्ट्रांसारखी आंतरराष्ट्रीय संस्था तसेच मानवी हक्क संघटना कशा गप्प बसू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

धारवाड येथे संघाची तीन दिवसांची ‘अखिल भारतीय कार्यकारी मंडळा’ची तीनदिवसीय बैठक गुरुवारी सुरू झाली. सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सर्व सहकार्यवाह तसेच, प्रांतसंघचालक, कार्यवाह प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, संघपरिवारातील संघटनांचे सचिव असे एकूण साडेतीनशे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित आहेत. २०२५ मध्ये संघाच्या शतकमहोत्सवी वर्षांनिमित्त तीन वर्षांचा विस्तार कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून त्याचाही सविस्तर आराखडा या बैठकीत निश्चित केला जाणार आहे. शनिवारी बैठकीची सांगता होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.