पीटीआय, नवी दिल्ली
अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशिया हा आजही भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार असून, यापुढेही हे समीकरण कायम राहील असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. आकडेवारी पाहता, सप्टेंबर २०२५मध्ये एकट्या रशियाकडून भारताने ३४ टक्के तेल खरेदी केले.

भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्यामुळे रशियाला युक्रेनविरोधातील युद्धासाठी मोठा निधी उपलब्ध होतो, असा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के दंडात्मक आयातशुल्कासह एकूण ५० टक्के आयातशुल्क लादले आहे. मात्र, त्याचा भारत-रशिया व्यापारावर नगण्य परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबर २०२५मध्ये भारताने दररोज ४७ दशलक्ष पिंपे तेल आयात केले. त्यापैकी १६ दशलक्ष पिंपे एकट्या रशियाकडून विकत घेण्यात आली. हे प्रमाण ३४ ट्कके आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते ऑगस्टदरम्यान केलेल्या तेलखरेदीच्या तुलनेत सप्टेंबरमधील खरेदीमध्ये काहीशी घट झाल्याची माहिती जागतिक व्यापार विश्लेषक फर्म ‘केपलर’ने दिली आहे. ‘केपलर’चे संशोधक विश्लेषक सुमित रिटोलिया यांनी सांगितले की, “सप्टेंबरमध्ये घट झाली असली तरी, रशिया हा भारतीय तेलशुद्धिकरण कंपन्यांसाठी सर्वात किफायतशीर पर्याय आहे. रशियाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या तेलाचे एकूण उत्पादन मूल्य (जीपीडब्ल्यू) आणि सवलत हा अन्य पर्यायांपेक्षा आकर्षक आहे.”

युक्रेन युद्धानंतर पाश्चात्त्य देशांनी लादलेल्या निर्बंधांनंतर रशियाने भारताला सवलत देऊ केली आहे. युद्धापूर्वी भारताच्या तेलआयातीमध्ये रशियाचा वाटा केवळ एक टक्का होता, तो युद्धानंतर वाढून ४० टक्क्यांपर्यंत गेला.

तेलपुरवठादारांमध्ये अमेरिका पाचवी युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशिया हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा तेलपुरवठादार देश असून अमेरिकेचा क्रमांक पाचवा आहे. रशियासह इराक (८,८१,११५ पिंपे प्रतिदिन), सौदी अरेबिया (६,०३,४७१ पिंपे प्रतिदिन), संयुक्त अरब अमिरात (५,९४,१५२ पिंपे प्रतिदिन) आणि अमेरिका (२,०६,६६७ पिंपे प्रतिदिन) हे भारताचे मोठे तेलपुरवठादार देश आहेत.