युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान सोमवारी तिसऱ्या फेरीची बैठक झाली. युक्रेननं ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलंय, तर रशिया मात्र समाधानी नसल्याचं दिसून येतंय. दरम्यान, किव्हने जर आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही लष्करी कारवाया थांबवण्यास आहोत, असं क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं.

रशियाने किव्हसमोर चार अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य केल्यास आम्ही किव्हमधील लष्करी कारवाया थांबवू, असं म्हटलंय. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

काय आहेत या चार अटी

  • युक्रेनने लष्करी कारवाई थांबवावी

“आम्ही खरोखरच युक्रेनवरील कारवाई पूर्णपणे थांबवू. पण त्यापूर्वी सर्वात महत्वाचं म्हणजे युक्रेनने आपली लष्करी कारवाई थांबवली पाहिजे. युक्रेनने लष्करी कारवाई थांबवल्यास रशियन सैन्य गोळीबार करणार नाही,” असे क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितले.

  • युक्रेनने संविधान बदलावं

“युक्रेनने त्यांच्या संविधानात दुरुस्ती करावी. ज्यानुसार युक्रेन तटस्थ राहील आणि कोणत्याही गटात सामील होणार नाही,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • क्रिमियाला रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्या

“युक्रेनने क्रिमियाला रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • डोनेस्तक आणि लुगान्स्क प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्या

“डोनेस्तक आणि लुगान्स्क स्वतंत्र राष्ट्रे आहेत, हे युक्रेनने मान्य करावं आणि त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी. या दोन्ही प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिल्यास हे युद्ध लगेच थांबेल,” असंही क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितलं.