अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या आदेशानुसार रशियाने सॅनफ्रान्सिस्को व न्यूयॉर्क येथील वाणिज्य दूतावास परिसरांचा ताबा सोडला आहे. नंतर लगेचच अमेरिकेने आतापर्यंत रशियाच्या ताब्यात असलेल्या तीन ठिकाणांचे नियंत्रण हाती घेतले आहे. सॅनफ्रान्सिकोत एक तर न्यूयॉर्कमध्ये दोन वाणिज्य दूतावास होते. ट्रम्प प्रशासनाने रशियाला तीन राजनैतिक संकुले बंद करण्यास सांगितले होते. रशियाने गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले होते त्याचा  बदला घेण्यासाठी अमेरिकेनेही तीन दूतावास संकुले बंद करण्याचे फर्मान रशियाविरोधात काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटल्यानुसार ट्रम्प प्रशासनाच्या आदेशानुसार रशियाने राजनैतिक संकुले रिकामी केली आहेत. रशिया आता ही संकुले वापरू शकणार नाही. आता अमेरिकेचे नियंत्रण या तीनही इमारतींवर आहे. आता या संकुलांमध्ये प्रवेश करण्यासाठी अमेरिकी परराष्ट्र खात्याची परवानगी आवश्यक ठरणार आहे. असे असले तरी आताच्या घडामोडीत कुठल्याही रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलेली नाही. रशियाचे दूतावास अधिकारी व अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी सॅनफ्रान्सिस्को, वॉशिंग्टन व न्यूयॉर्क येथील वाणिज्य दूतावास परिसराची पाहणी केली.

रशियन सरकारने त्यांचा ताबा सोडल्याची खातरजमा करण्यात आली. यात अमेरिकेने व्हिएन्ना जाहीरनाम्याचे पालन केले असल्याचे सांगण्यात आले. एफबीआयने हे परिसर रिकामे करण्याचे ठरवले होते तसेच दारे तोडली जातील अशी धमकी अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिल्याच्या बातम्यात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले.

* रशियाने गेल्या महिन्यात अमेरिकेला त्यांचे दूतावास कर्मचारी कमी करण्यास सांगितले होते.

* अमेरिकेने रशियावर निर्बंध जारी केल्याने ही कारवाई केली होती. त्यात अमेरिकेने दूतावास कर्मचारी ७५५ ने कमी केले होते.

* रशियावर अमेरिकी काँग्रेसने निर्बंध जारी केल्यानंतर दूतावास कर्मचारी ४५५ ने कमी करावेत असे रशियाने सांगितले होते.

*  अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत २०१६ मध्ये रशियाने केलेला हस्तक्षेप तसेच २०१४ मध्ये युक्रेनमधील क्रिमियाचा घेतलेला ताबा यामुळे रशियावर निर्बंध लादण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia shuts down san francisco consulate and annexes in new york washington dc
First published on: 04-09-2017 at 01:47 IST