रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून रशियाकडून युक्रेमधील नागरी वस्त्या तसेच नागरिकांना लक्ष्य केलं जातंय. दरम्यान, रशियाने मारियोपोल शहरातील एका शाळेवर बॉम्बहल्ला केल्याचा दावा युक्रेनने केलाय. या हल्ल्यात पूर्ण शाळा उद्ध्वस्त झाली असून ४०० लोकांनी शाळेत आश्रय घेतला होता, असंदेखील युक्रेन प्रशासनाने सांगितलं आहे.

युक्रेनियन प्रशासनाने काय दावा केलाय ?

“मारियोपोल या बंदराच्या शहरामध्ये एका शाळेत ४०० लोकांनी आश्रय घेतला होता. या शाळेवर रशियन फौजांनी आज बॉम्बहल्ला केला,” असं युक्रेन प्रशासनाने सांगितलंय.

मारियोपोलमधील स्टीलचा कारखाना उद्ध्वस्त

दुसरीकडे युक्रेनमधील कीव्ह, मारियोपोल अशा महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवण्याचा रशियन फौजा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी रशियन सैनिकांकडून युक्रेमधील मारियोपोल तसेच कीव्ह या शहर परिसरात बॉम्बहल्ले तसेच गोळीबार सुरु आहेत. युक्रेनीयन सैनिकदेखील रशियाला तेवढ्याच क्षमतेने प्रत्युत्तर देत आहेत. या संघर्षामध्ये मारियोपोल या बंदर असलेल्या शहरामधील स्टीलचा कारखाना उद्ध्वस्त झालाय. मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्यात लोह तसेच पोलादनिर्मिती करण्यात येत होती. युरोपमधील हा सर्वात मोठा कारखाना होता.

झेलेन्स्की यांच्याकडून शांततेचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शांततेचे आवाहन केले आहे. या युद्धाची किंमत रशियाला अनेक पिढ्यांपार्यंत मोजावी लागेल, असं झेलेन्स्की यांनी म्हटंलंय. तसेच त्यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना चर्चेचं आणि भेटण्याचं आवाहन केलंय.