नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथे झालेला हिंसाचार हा सुनियोजित कटाचा भाग होता असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत केला. देशभरात खोदकाम करण्याच्या भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चर्चेमुळे देशातील धार्मिक सौहार्दाचे नुकसान होईल असा इशारा त्यांनी दिला.

लोकसभेत हा मुद्दा मांडताना अखिलेश यादव यांनी संभल हिंसाचाराला स्थानिक पोलीस आणि प्रशासन दोषी असल्याचा आरोप केला. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित केले जावे आणि त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, जेणेकरून यापुढे संविधानाचे अशा प्रकारे उल्लंघन होणार नाही, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी अधिकृत आणि वैयक्तिक शस्त्रांनी गोळीबार केला, त्यामध्ये पाच निरपराध ठार झाले आणि इतर अनेक जण जखमी झाले. पोलिसांच्या अरेरावीविरोधात स्थानिकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी हा गोळीबार केल्याचे यादव म्हणाले.

अखिलेश यादव लोकसभेत बोलत असताना सत्ताधारी बाकांवरून अधूनमधून अडथळे आणले जात होते. संभल हिंसाचारात भाजपचे अंतर्गत राजकारणही होते असेही त्यांनी सूचित केले. भाजपसाठी ही दिल्ली व लखनऊदरम्यानची लढाई होती असा दावा त्यांनी केला. त्यापूर्वी लोकसभेत संभल मुद्द्यावरून प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधकांनी थोडा वेळ सभात्याग केला.

हेही वाचा >>> हेजबोलावर इस्रायलचे पुन्हा हवाई हल्ले; शस्त्रसंधी करार झाल्यानंतर आठवड्यातच पुन्हा संघर्ष

राहुल गांधी आज संभलला जाणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे पाच खासदार बुधवारी संभलला भेट देणार आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी मंगळवारी दिली. या शिष्टमंडळाबरोबर वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी-वढेरा याही जाण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले. संभलमध्ये बाहेरील व्यक्तींना १० डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी आहे, त्याशिवाय शहरात ३१ डिसेंबरपर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

… तर रविवारीही कामकाज

सभागृहाचे कामकाज यापुढे तहकूब करावे लागल्यास वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी रविवारीही कामकाज घेतले जाईल असा इशारा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी दिला. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर, बिर्ला यांनी सांगितले की १३ डिसेंबर आणि १४ डिसेंबरला संविधानावर चर्चा होणार आहे. १४ डिसेंबरला शनिवार असून सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होईल. गोँधळ सुरूच राहिला तर यापुढे तुम्हाला शनिवारी आणि रविवारीही यावे लागेल, असे बिर्ला यांनी सदस्यांना सुनावले.