“संजय राऊतजी, धक्का तर आम्हाला बसला आहे”, ऑक्सिजनच्या मुद्द्यावर भाजपाचं प्रत्युत्तर!

ऑक्सिजन अभावी एकाही मृत्यूची नोंद नसल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला संबित पात्रांनी उत्तर दिलं आहे.

sambit patra on sanjay raut
संबित पात्रांची संजय राऊतांवर खोचक टीका

देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाल्याची नोंद नसल्याची आकडेवारी केंद्र सरकारकडून मंगळवारी संसदेत मांडण्यात आली. त्यावरून देशभरात राजकीय चर्चा सुरू झाली असून विरोधकांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांमध्ये ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. राज्यात शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारच्या या दाव्यानंतर आपल्याला धक्का बसल्याचं विधान केल्यानंतर आता त्याला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना उत्तर देत आम्हालाच धक्का बसल्याचं सांगितलं आहे.

“संजय राऊतांना कदाचित पूर्ण माहिती नाही”

संबित पात्रा यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या मुद्द्यावरून संजय राऊत आणि महाराष्ट्र सरकारवर देखील टीकास्त्र सोडलं आहे. “संजय राऊतांना कदाचित पूर्ण माहिती नाही. संजय राऊत म्हणत होते की आम्हाला धक्का बसला. अशा मृत्यूंमुळे धक्का बसलाच पाहिजे. पण खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल, तर आम्हाला धक्का बसला आहे. तुम्ही अशा विषयांवर राजकारण करत आहात”, असं संबित पात्रा म्हणाले आहेत.

महाराष्ट्र सरकारने स्वत: प्रतिज्ञापत्र दिलंय

दरम्यान, यावेळी ऑक्सिजनअभावी मृत्यू न झाल्याचं प्रतिज्ञापत्र खुद्द महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केल्याचं संबित पात्रांनी सांगितलं. “महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्रात हे सांगितलं आहे की महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही. ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्याच नातेवाईकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारणा केल्यानंतर त्यावर राज्य सरकारनं उत्तर दिलं आहे”, असं ते म्हणाले.

 

“इक्बालसिंह चहल यांनीही हेच सांगितलं”

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील केंद्र सरकारकडून तातडीने ऑक्सिजन पुरवठा झाला असून त्यांना दोष देता येणार नसल्याचं सांगितल्याचं संबित पात्रा यांनी म्हटलं. “खुद्द इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं आहे की ऑक्सिजन तुटवडा झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला फोन केला होता. त्यानंतर लागलीच ऑक्सिजन पुरवठा झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारवर आरोप करणं चुकीचं ठरेल. राज्यांकडून कदाचित चूक होऊ शकते”, असं संबित पात्रा म्हणाले आहेत.

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर संजय राऊत संतापले; म्हणाले…

“केंद्रानं मृतांचे जे आकडे संसदेत मांडले, ते केंद्राचे नसून राज्यांनी दिलेले आकडे आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची जर अशी तक्रार असेल, की केंद्रानं चुकीची आकडेवारी दिली आहे, तर त्या पक्षांनी आधी इतर राज्यांना विचारावं की त्यांनी खरी आकडेवारी केंद्राला दिली होती का?” असा सवाल देखील संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sambit patra slams sanjay raut on statement about oxygen shortage death figures by central govt pmw

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या