scorecardresearch

Sanjay Biyani Murder Case: नांदेडमधील बिल्डर हत्या प्रकरणाची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी घेतली दखल

नांदेड शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची भरदिवसा झालेली निर्घृण हत्या ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं पालकमंत्र्यांनी म्हटलंय.

sanjay biyani
नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते संजय बियानी

नांदेड शहरामधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा तपास केंद्रीय उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करून संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारास तात्काळ अटक करावी या मागणीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निवेदन दिले. माहेश्वरी समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदनही प्रताप यांनी अमित शहा यांना प्रत्यक्ष भेटून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात दिलं आले. अमित शाह यांनी निवेदन स्वीकारुन या प्रकरणासंदर्भात योग्य ती कारवाई नक्की केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.

विशेष योजना राबवणारे व्यवसायिक
नांदेड शहराच्या विकासात आणि वैभवात भर घालणारा एक उत्तम बांधकाम उद्योजक माहेश्‍वरी समाजातील तरुण समाजसेवक यासोबतच समाजशील व्यक्तिमत्व म्हणून संजय बियाणी यांची ख्याती होती. अल्पावधीत त्यांनी बांधकाम क्षेत्रात घेतलेली भरारी अतुलनीय होती. सामाजिक क्षेत्रातले त्यांचे काम तितकेच मोठे होते. माहेश्‍वरी समाजातील गोरगरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी विशेष योजना राबवत अल्पदरामध्ये घरे दिली होती. त्यामुळे संजय बियाणी यांचे सामाजिक आणि बांधकाम या क्षेत्रातील योगदान समाजहिताचे होते. मात्र पाच एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी अज्ञात मारेकर्‍यांनी बियाणी यांच्या घरासमोर त्यांना गोळ्या झाडून हात्या केली.

केंद्रीय तपास यंत्रणांकडे तपास देण्याची मागणी
बियाणी यांच्या हत्येला दोन दिवसाचा कालावधी लोटला असला तरी नांदेड पोलिसांना कोणतेही धागेदोरे सापडले नाहीत. नांदेड पोलिसांकडून योग्य दिशेने तपास होत नसल्याचेही चर्चिले जात आहे . याच पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तातडीने दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. या या हत्याकांडाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत करावा, बियाणी कुटुंबीयांना न्याय द्यावा, मारेकऱ्यांना आणि त्याच्या सूत्रधारास तात्काळ अटक करावी अशी मागणी प्रताप यांनी केलीय.

महेश्वरी समाजाचं निवेदनही दिलं…
याचवेळी प्रताप यांनी महेश्वरी समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे. प्रताप यांनी माहेश्वरी समाजाच्या मागण्याचे हे निवेदन पंतप्रधान कार्यालयात दिले आहे तसेच या निवेदनाची एक प्रत शाह यांना दिली आहे. त्यामुळे आता संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून झाल्यास निश्चितपणे तातडीने धागेदोरे हाती लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पालकमंत्र्यांनी दिला शब्द…
नांदेड शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची भरदिवसा झालेली निर्घृण हत्या ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेच्या मुळाशी जाऊन त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी येथे दिली.

विशेष तपास गटाची स्थापना…
पालकमंत्र्यांनी बियाणी परिवाराचे सांत्वन करून तपासाबाबत त्यांना आश्वस्त केल्यानंतर संजय यांच्या पार्थिवावर येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकही गठीत करण्यात आले आहे.

घरासमोर मोठी गर्दी…
संजय बियाणी यांची मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानासमोर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात बोकाळलेले खंडणीराज तसेच व्यावसायिकांना लक्ष्य करण्याचे वाढलेले प्रकार याविरुद्ध तीव्र सूर उमटला. व्यापारी आणि व्यावसायिकांच्या वेगवेगळय़ा संघटनांनी या हत्येचा निषेध नोंदवत बुधवारी आपले व्यवहार बंद ठेवले. संजय बियाणींच्या मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार नाहीत, असा पवित्रा त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक हितचिंतकांनी आधी घेतला होता. बुधवारी सकाळी बियाणी यांच्या घरासमोर जमलेल्या जनसमुदायाने पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध घोषणाबाजीही सुरू केली होती. त्याचवेळी अनिता बियाणी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेवर नापसंती व्यक्त केली. माझ्या पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्यास तसेच मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी होती.

पालकमंत्र्यांसोबत कुटुंबियांची बैठक…
एका बाजूला शोकमग्न तर दुसऱ्या बाजूने संतप्त अशा वातावरणात सकाळी साडेदहाच्या सुमारास पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे बियाणी यांच्या ‘राज’ या निवासस्थानी आगमन झाले. संजय यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर चव्हाण यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, व्यावसायिक दिनेश बाहेती प्रभृतींसह बियाणी परिवाराशी एका खोलीत सविस्तर चर्चा केली. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणात कोणतीही हयगय न करता मारेकऱ्यांना पकडण्यात येईल. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आपण बैठक घेणार आहोत, असे पालकमंत्री यांनी या वेळी स्पष्ट केले.

औरंगाबाद, बीडमध्ये आंदोलन
सुमारे ३० मिनिटांच्या चर्चेनंतर बियाणी परिवाराचे समाधान झाले. त्यानंतर सकाळपासूनचा ताणतणाव संपुष्टात आला. दरम्यान, या घटनेचे पडसाद संपूर्ण मराठवाडाभर उमटले. औरंगाबाद, बीड येथे मारेकऱ्यांना पकडण्यासाठी आंदोलनही करण्यात आले.

अंत्यसंस्काराला मोठी गर्दी
संजय बियाणी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात करण्यात आले. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. राजकारण, उद्योग, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांतील बियाणी यांच्या हितचिंतकांचा त्यात समावेश होता. खासदार चिखलीकर मंगळवारी मध्यरात्रीच येथे दाखल झाले तर पालकमंत्री अशोक चव्हाण मुंबई-हैदराबाद मार्गे सकाळी येथे पोहोचले. बियाणी यांच्या घरातून बाहेर पडताना त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या समुदायासमोर आपली भूमिका स्पष्ट करून त्यांना शांत केले. नंतर अंत्यसंस्कारप्रसंगी मंत्री चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने हजर होते.

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी
संजय बियाणी यांची अंत्ययात्रा वजिराबाद चौकातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पोहोचताच अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या कोलंबी येथील ग्रामस्थांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी मारेकऱ्यांना अटक केली जाईल असे आश्वासन दिले, त्यामुळे तणाव निवळला.

रस्त्यावर उतरु…
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी का केली नाही, असे म्हणत प्रताप पाटील चिखलीकर यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. येत्या पाच दिवसांत मारेकऱ्यांसह हत्येमागील मुख्य सूत्रधारास अटक झाली नाही तर, समाज रस्त्यावर उतरेल, भारतीय जनता पार्टी या आंदोलनात सहभागी होईल, असा इशारा खासदार चिखलीकर यांनी दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay biyani murder case pratap patil chikhalikar meet amit shah demand for central agency investigation scsg

ताज्या बातम्या