तामिळनाडूचे डीएमके नेते आणि मंत्री व्ही सेंथिल बालाजी आणि त्यांच्या पत्नीने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळावे याकरता दोन याचिका करण्यात आल्या होत्या. परंतु, न्यायालयाने या याचिका फेटाळल्या असून सेंथिल बालाजी यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
मंत्री व्ही. सेंथिल बालाजी आणि त्यांच्या पत्नी एस. मेगला यांनी दोन स्वंतत्र याचिका केल्या होत्या. मद्रास हायकोर्टाने १४ जुलै रोजी ईडीला मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सेंथिल बालाजी यांच्या अटकेचे आदेश दिले होते. २०१५ मध्ये राज्य वाहतूक विभागात झालेल्या Cash For Job या घोटाळ्यात सेंथिल यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीअंतर्गत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यासाठी मद्रास हायकोर्टाने अटकेचे आदेश दिले होते. या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
बालाजी यांच्यावरील आरोप हे AIADMK सरकारच्या काळात २०११ ते २०१५ दरम्यान परिवहन मंत्री असताना झाले होते. तामिळनाडूमध्ये द्रमुकची सत्ता आल्यानंतर ईडीने हे प्रकरण हाती घेतले.
सेंथिल बालाजी यांना १४ जून रोजी ईडीने १८ तासांच्या चौकशीनंतर आणि राज्य सचिवालयातील त्यांच्या अधिकृत निवासस्थानाची आणि चेंबरची झडती घेतल्यानंतर अटक केली होती. छातीत दुखू लागल्याने अटकेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली.