करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २५ मार्चपासून सुरु असणाऱ्या लॉकडाउनचा पाचवा टप्पा एक जूनपासून सुरु झाला आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये अनेक सेवा पुन्हा सुरु करण्यासंदर्भात काही अटी आणि शर्थी ठेवत परवानगी देण्यात आली आहे. तर आठ जूनपासून हॉटेल, मॉल, धार्मिक स्थळे टप्प्याटप्प्यांमध्ये सुरु करण्यासंदर्भातील सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. असं असतानाच देशातील ३३ कोटी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मात्र शाळा आणि महाविद्यालये कधी सुरु होणार यासंदर्भात अद्यापही संभ्रमावस्थेत आहेत. मात्र केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाळा कधी सुरु होणार यासंदर्भातील संकेत दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निशंक यांनी तीन जून रोजी बीबीसीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भातील प्रश्न निशंक यांना विचारण्यात आला. त्यावेळी १६ मार्चपासून देशभरामध्ये बंद असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालये ऑगस्ट महिन्यानंतर पुन्हा सुरु होणार असल्याचे सांगितले. मे महिन्यामध्ये समोर आलेल्या काही वृत्तानुसार जुलै महिन्यामध्ये ३० टक्के हजेरीसहीत देशभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु होती. इयत्ता आठवीपासून पुढील वर्ग हे ३० टक्के हजेरीसहीत सुरु करण्यात येतील असं बोललं जात होतं. सुरुवातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील शाळा सुरु होती. तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन सत्रांमध्ये वर्ग भरवले जातील अशा चर्चा सुरु असतानाच निशंक यांनी या चर्चांना पूर्वविराम दिला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पत्रक जारी करुन शाळा इतक्यात सुरु होणार नसल्यासंदर्भातील माहिती दिली होती.

एकीकडे हळूहळू इतर सेवा सुरु होत असतानाच विद्यार्थी आणि पालकांमधील संभ्रम कायम आहे. यावरच पडदा टाकताना निशंक यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्ट महिन्यामध्ये त्यातही १५ ऑगस्टनंतरच सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे. “सध्या घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांचे निकाल १५ ऑगस्टपर्यंत लावण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये ज्या परीक्षा झाल्या आहेत आणि ज्या होणार आहेत त्यांचाही निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे,” अशी माहिती निशंक यांनी दिली. त्यानंतर निशंक यांना म्हणजेच शाळा आणि महाविद्यालये १५ ऑगस्टनंतर सुरु होणार असंच म्हणता येईल का असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या महिलेने विचारला. त्यावर निशंक यांनी ‘अर्थात’ असं उत्तर दिलं.

सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा या १ जुलै ते १५ जुलै दरम्यान होणार असून आयसीएससी आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षा १ जुलै ते १२ जुलैदरम्यान होणार आहेत. याचबरोबर ‘नेट’ची (NEET) परीक्षा २६ जुलै रोजी तर ‘जेईई’ची (JEE) परीक्षा १८ जुलै ते २३ जुलै दरम्यान होणार आहे.

शाळा आणि विद्यापीठे सुरु करण्याआधी विद्यापीठ अनुदान आयोग हे विद्यापिठांमधील नव्या नियमांसंदर्भात तर राष्ट्रीय शिक्षा संशोधन, तसेच प्रशिक्षण संस्था (एनसीईआरटी) शाळामधील नव्या नियमांसंदर्भातील मार्गदर्शक तत्वांवर काम करत असून लवकरच यासंदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools will reopen after august 2020 hrd minister ramesh pokhriyal scsg
First published on: 07-06-2020 at 15:02 IST