एकीकडे देशभरात आज धुळवड साजरी केली जात असताना, दुसरीकडे मध्य प्रदेशमधील राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमधील २० मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. तर, नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिंया हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी मोठं सूचक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

भारतीय जनता पार्टीत प्रत्येकाचे मनापासून स्वागत आहे. आम्ही तळागाळातील कार्यकर्त्यांना देखील सामावून घेतो. सिंधिंयाजी हे खूप मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत आहे. असं भाजपा नेते नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमलनाथ यांच्याविरोधात ज्योतिरादित्य सिंधियांनी बंडाचा झेंडा उभारल्याचे दिसत आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री होणार का? की पुन्हा एकदा शिवराज सिंग चौहान यांचे सरकार येणार आणि ज्योतिरादित्य त्यांना पाठिंबा देणार? या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी काल दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली होती.

आणखी वाचा- मध्य प्रदेशात राजकीय धुळवड रंगात; कमलनाथ सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे

त्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रिमंडळातील २० मंत्र्यांनी कमलनाथ यांना आपला राजीनामा सादर केला आहे. शिवाय कमलनाथ यांना मंत्रिमंडळ पुनर्चनेसाठी मंत्र्यांनी अधिकारही दिले आहेत.