टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सीट बेल्ट संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य असेल, असे ट्वीट गडकरी यांनी केले आहे. “सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर कारमध्ये मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी सीट बेल्ट बीप प्रणालीदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे”, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावला जाणार आहे. या आदेशाची येत्या तीन दिवसांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. सायरस मिस्री यांच्या निधनानंतर तज्ज्ञ आणि टीकाकारांनी वाहतूक सुरक्षेसंदर्भातील नियमांकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहेत.
“मागील सीटवर बसलेल्यांनी सीट बेल्ट लावण्याची गरज नाही असे लोकांना वाटते. चारचाकीत प्रवास करताना फक्त पुढे बसलेल्यांनीच सीट बेल्ट लावायचा असतो, अशी लोकांची समजूत आहे. पुढे आणि मागे बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावला पाहिजे”, असे आवाहन एका कार्यक्रमात गडकरी यांनी नुकतेच केले होते.
“सर्वांनी सीट बेल्ट…” सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर दिया मिर्झाचे ‘ते’ ट्वीट व्हायरल
अहमदाबादकडून मुंबईच्या दिशेने येत असताना सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडिज कारला पालघरमध्ये अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासोबतच जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला आहे. मागील सीटवर बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कार पुलाच्या कठड्याला धडकताच कारमधील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या. त्याचवेळी मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने त्यांचे संरक्षण होऊ शकले नाही. या अपघातानंतर रस्ते वाहतूक सुरक्षेसदंर्भातील मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.