Seat No. 11A Mystery: अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई विमानतळावरून १२ जून रोजी एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानाने लंडनसाठी उड्डाण घेतलं. पण अवघ्या ३० सेकंदात हे विमान मेघानी नगर येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं. विमान कोसळताच विमानातील एक लाख लीटरहून अधिक असलेल्या इंधनाच्या साठ्याचा मोठा स्फोट झाला. ज्यात विमानात प्रवास करत असलेल्या २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर विमान कोसळल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील ३३ लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच विमानात ११ए या सीटवर बसलेले विश्वासकुमार रमेश जिवंत वाचले. त्यामुळे आता ११ए या सीटबाबत गूढ निर्माण झाले आहे. अशातच या सीटचा आणखी एक इतिहास समोर आला आहे.
२७ वर्षांपूर्वी थायलंडमध्ये झालेल्या विमान अपघातामधून अभिनेते आणि गायक रुआंगसाक लोयचुसाक हेदेखील सुखरुप बचावले होते. योगायोग म्हणजे विश्वासकुमार रमेश ज्या ११ए सीटवर बसले होते, त्याच सीटवरून रुआंगसाक लोयचुसाक हेदेखील प्रवास करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
११ डिसेंबर १९९८ रोजी २० वर्षांचे रुआंगसाक लोयचुसाक थाई एअरवेजच्या फ्लाईट क्र. TG261 मधून प्रवास करत होते. दक्षिण थायलंडमध्ये विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना ते अचानक एका दलदलीच्या भागात कोसळले. विमानात एकूण १४६ प्रवासी होते, ज्यापैकी १०१ जणांचा मृत्यू झाला.
रुआंगसाक लोयचुसाक आता ४७ वर्षांचे आहेत. त्यांना जेव्हा एअर इंडियाचा अपघात आणि ११ए सीटवर बसलेले विश्वासकुमार रमेश जिवंत वाचल्याचे कळले तेव्हा त्यांच्या मनातील जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. माझे शरीर शहारून आले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. विश्वासकुमार रमेश हे ब्रिटिश नागरिक असून आपल्या भावासह ते लंडनला आपल्या घरी परतत होते. दुर्दैवाने त्यांच्या भावाचा मात्र अपघातात मृत्यू झाला.
रुआंगसाक लोयचुसाक यांनी थाई भाषेत फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “भारतात झालेल्या विमान अपघातातील बचावलेला एकमेव व्यक्ती माझ्यासारखाच ११ए या सीटवर बसला होता”, असा उल्लेख रुआंगसाक यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
रुआंगसाक पुढे म्हणाले की, अपघातानंतर त्यांच्याकडे त्यांचा बोर्डिंग पास नव्हता. पण वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमध्ये त्यांचा सीट नंबर देण्यात आला होता. मृत्यूला चकवा दिल्यानंतर अनेक वर्ष रुआंगसाक अपराधी भावनेत जगत होते. त्यांना जबर मानसिक धक्का बसला होता. याबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानही दिले होते. तसेच अपघातानंतर सुमारे एक दशक त्यांनी विमानात प्रवास केला नव्हता.
विमान अपघातामधून जिवंत वाचल्यानंतर जणू काही आपला पुर्नजन्मच झाला असे वाटत होते, असेही रुआंगसाक यांनी पोस्टमध्ये लिहिले. त्यांनी एअर इंडिया दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
११ए सीटबद्दल जगभरात उत्सुकता
दरम्यान एअर इंडियाच्या अपघातानंतर आता ११ए सीटबद्दल जगभरात उत्सुकता व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या सीटच्या वैशिष्ट्यांची चर्चा होत आहे. आपत्कालीन एक्झिटजवळ असलेल्या या सीटमुळे विश्वासकुमार रमेश अपघातानंतर तात्काळ बाहेर पडू शकले होते. त्यांना दुखापतही झाली. पण ते स्वतःच्या पायावर चालत जाऊन रुग्णवाहिकेत बसले.