संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीतील १२ खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधातील विरोधकांची एकजूट समोर आली आहे. याबाबत रणनिती आखण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक आणि शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केली.

प्राप्त माहितीनुसार या बैठकीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, द्रमुकचे टीआर बालू, डाव्या आघाडीचे नेते सीताराम येचुरी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची उपस्थिती होती. ही बैठक पार पडल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतक्रिया दिली.

“राज्यनिहाय विरोधकांची एकजुट हा आमचा मुख्य अजेंडा होता. ही पहिलीच भेट होती, उद्या पुन्हा भेटू, शरद पवार असतील.” असं संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं. याचबरोबर, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी १२ निलंबित राज्यसभा खासदारांना दिलगिरी व्यक्त करण्यासाठी केलेल्या आवाहनावर बोलताना संजय राऊत यांनी, “माफी नाही, दिलगिरी नाही, आम्ही लढू”, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली.

तर, एनडीटीव्ही सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत शरद पवार यांना खासदारांच्या निलंबन प्रकरणी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडूशी बोलण्यास सांगितले गेले आहे. तसेच, सध्या काँग्रेसशी काहीसे बिनसलेल्या तृणमूल काँग्रेसला या बैठकीस बोलावले गेले नव्हते अशी देखील माहिती समोर आली आहे. सध्या खासदारांच्या निलंबनाच्या मुद्य्यावरून संसद अधिवेशन चांगलेच गाजत आहे. या मुद्य्यावरून दोन्ही सभागृहाचे कामकाज देखील बंद पडले.

“…ही लोकशाहीची हत्या आहे” ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

आजच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या मुद्य्यावरून मोदी सरकारवर टीका केली. “आज आमचे जे विरोधी पक्षांचे निलंबित खासदार आहेत. त्यांचे १४ दिवस निलंबनाचे झाले आहेत. सभागृहात ज्या गोष्टींबद्दल विरोधक चर्चा करू इच्छित आहे, ती चर्चा सरकार होऊ देत नाही आणि जेथे पण विरोधक आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न करते, तर धमकावून, भीती दाखवून त्यांना निलंबित करून सरकार काम करत आहे, ही लोकशाहीची हत्या आहे. संसद सभागृहात चर्चा झाली पाहिजे सर्व मुद्द्य्यांवर चर्चा व्हायला हवी. परंतु जी चर्चा आम्ही करू इच्छित आहोत. ते आम्हाला करू दिलं जात नाही. सरकारवर आम्ही प्रश्न उपस्थित करायचं म्हटलं तर सरकार प्रश्न उपस्थित करू देत नाही.” असं राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.