नवी दिल्ली : संसदेतील कृत्याबद्दल राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांनी माफी मागायला हवी होती. काँग्रेस नेत्यांचा अहंकार पत्रकार परिषदेमध्येही दिसत होता. मी बरीच वर्षे विधानसभा व संसदेचा सदस्य राहिलो आहे, पण गुरुवारी संसदेत जे झाले त्याची मी कल्पनाही केली नव्हती. काँग्रेस सदस्यांचे अशोभनीय वर्तन आणि गुंडगिरी पाहिली, असा आरोप केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत केला.

संसदेच्या सदस्यांना निदर्शने करण्याचा अधिकार आहे. गेले काही दिवस काँग्रेसचे सदस्यही मकरद्वारासमोर निदर्शने करत होते. तेव्हा भाजपचे सदस्य बाजूच्या मोकळ्या जागेतून किंवा दुसऱ्या दाराने आत जात असत. पण गुरुवारी भाजपचे सदस्य मकरद्वारांच्या पायऱ्यांवर निदर्शने करत असताना राहुल गांधींना आत जाण्यासाठी मोकळ्या जागेचा वापर करावा अशी विनंती सुरक्षारक्षकांनी केली होती. पण जाणीवपूर्वक राहुल गांधी भाजपच्या सदस्यांसमोर गेले आणि त्यांनी धक्काबुक्की केली, गुंडागर्दी केली. त्यामुळे भाजपचे वयस्क खासदार प्रताप सारंगी खाली पडले, ते जखमी झाले. त्यांच्यावर उपचार होत आहेत. रुग्णालयात दाखल झालेले खासदार मुकेश राजपूत बेशुद्ध झाले होते, असे शिवराजसिंह चौहान म्हणाले.काँग्रेसला संसदेमध्ये गुंड पाठवायचे आहेत का? हे लोक संसदेत मारहाण करणार का? काँग्रेसच्या सदस्यांचे वर्तन लज्जास्पद होते, असा आरोपही शिवराजसिंह यांनी केला.

Story img Loader