Shubhanshu Shukla Took Gajar Ka Halwa, Aamras To Space: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याशी काल (शनिवारी) खास संवाद साधला. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयानेच दिली आहे. या संभाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शुभांशू यांचे केवळ कौतुकच केले नाही, तर त्यांनी याला गगनयान मोहिमेचा पहिला अध्याय देखील म्हटले आहे.

आमरस, गाजराचा हलवा आणि…

पंतप्रधान मोदींशी बोलताना शुभांशू म्हणाले की, “मी इथे पूर्णपणे ठीक आहे, मला खूप छान वाटत आहे, हा एक नवीन अनुभव आहे.” यावेळी शुभांशू यांनी असेही सांगितले की, “अंतराळात येताना मी घरून आमरस, गाजराचा हलवा आणि मूग डाळ हलवा सोबत आणला आहे.”

मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की…

या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी शुभांशूंना एक विशेष संदेश दिला आणि म्हटले की, “आज मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे. तुमचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ अवकाशापुरता मर्यादित नाही, तर तो विकसित भारताच्या आपल्या दिशेला गती आणि नवीन बळ देईल. भारत आता जगासाठी अवकाशाच्या नवीन शक्यतांचे दरवाजे उघडणार आहे. आता भारत फक्त उड्डाण करणार नाही, तर भविष्यात नवीन उड्डाणांसाठी व्यासपीठ तयार करणार आहे.”

पंतप्रधान मोदींचे तरुणांना आवाहन

पंतप्रधान पुढे म्हणाले की, शुभांशू यांच्या चांद्रयानाच्या यशानंतर देशातील मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये विज्ञानाची एक नवीन आवड निर्माण झाली असून, अंतराळाची आवड वाढली आहे. आता तुमचा हा ऐतिहासिक प्रवास त्या संकल्पाला आणखी बळकटी देत आहे. आज मुले फक्त आकाशाकडे पाहत नाहीत, त्यांना वाटते की मीही तिथे पोहोचू शकतो. ही विचारसरणी, ही भावना आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांचा खरा पाया आहे.

शुभांशू यांचे व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, पंतप्रधान मोदी शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर संवाद साधणार असल्याचे आधीच ठरले होते. तत्पूर्वी शुभांशू यांचे काही व्हिडिओ मेसेजेस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर ते खूप उत्साहित दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे अ‍ॅक्सिओम-४ मिशन?

एअर फोर्स ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला अ‍ॅक्सिओम-४ मिशनवर गेले आहेत. ते १४ दिवस अंतराळ स्थानकात राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे हे चौथे खाजगी मानवी अंतराळ उड्डाण मिशन आहे. ते अंतराळाच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते. आता असे सांगितले जात आहे की, या मोहिमेद्वारे सर्व अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात ६० वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत.