कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं. सिद्धरामय्या म्हणाले, “मी महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा माझं एका मुलीवर प्रेम होतं. मी मोठ्या हिंमतीने त्या मुलीसमोर माझ्या प्रेमाची कबुली दिली आणि तिला लग्नासाठी विचारलं. मात्र आमची जात वेगवेगळी असल्यामुळे ते नातं पुढे जाऊ शकलं नाही.” कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, “त्या मुलीने मला नकार दिला. मला वाटतं कदाचित आमच्या दोघांच्या जाती वेगवेगळ्या असल्यामुळे तिने नकार दिला असावा. जातीमुळे आमचं नातं पुढे जाऊ शकलं नाही.”

सिद्धरामय्या म्हणाले, “जातीमुळे मला त्या मुलीशी लग्न करता आलं नाही जिच्यावर माझं प्रेम होतं. त्यावेळी अशी स्थिती निर्माण झाली की, मला माझ्या जातीतल्या दुसऱ्या मुलीशी लग्न करावं लागलं. समाजातील जातीय भेदभावामुळे माझी प्रेमकहाणी यशस्वी होऊ शकली नाही.” सिद्धरामय्या त्यांच्या अधुऱ्या प्रेमकहाणीबद्दल सांगत असताना उपस्थित लोक टाळ्या वाजवत होते. राज्याचे मुख्यमंत्री किती सहजपणे सर्वांसमोर आपल्या प्रेमकहाणीबद्दल सांगतायत हे पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटलं. ते त्यांच्या आंतरजातीय प्रेमकहाणीबद्दल बोलतायत आणि आजच्या पिढीला आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन देतायत हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या कार्यक्रमात सिद्धरामय्या म्हणाले, “आमचं सरकार आंतरजातीय विवाहांना पूर्ण पाठिंबा देईल.”

सिद्धरामय्या हे अशा कोणत्याही कार्यक्रमात राजकीय टिका-टिप्पणी, सरकारची कामं, भाजपाचं राजकारण आणि इतर विषयांवर बोलतात. मात्र यावेळी ते स्वतःच्या पूर्ण न होऊ शकलेल्या प्रेमकहाणीबद्दल बोलले. ते म्हणाले, समाजातील जातीयवाद आपण नष्ट करायला हवा. आंतरजातीय विवाहांमुळे जातीयवाद नष्ट होण्यास मदत होईल. आपल्या समाजात अजूनही वेगवेगळ्या परंपरा, धारणा आहेत. प्रेमविवाहांना अजूनही आपल्याकडे फारशी मान्यता नाही. त्यात आंतरजातीय विवाहांना बिलकूल मान्यता दिली जात नाही. अनेक ठिकाणी अशा जोडप्यांचा खून केला जातो. त्यामुळे आमचं सरकार आंतरजातीय विवाहांना पाठिंबा आणि सुरक्षा प्रदान करेल.”

हे ही वाचा >> लखनौमध्ये निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरावर दरोडा, पत्नीची हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तरुणांना आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन दिलं. तसेच ते म्हणाले, “आपल्या समाजातील जातीय भेदभाव नष्ट करण्याचे दोन मार्ग आहेत. त्यातला पहिला मार्ग म्हणजे आंतरजातीय विवाह आणि दुसरा मार्ग म्हणजे सर्व समुदायांचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणे. लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीशिवाय आपल्या देशात सामाजिक समानता नांदणार नाही.”