१९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) फेटाळून लावत त्यांच्यावर खटला चालवणार असल्याचे म्हटले आहे. सज्जन कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात सदर खटला रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली होती.  दंगलीदरम्यान सुरजीत सिंग यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याप्रकरणी सुलतानपुरीच्या खटल्यामध्ये न्यायाधीश ए.के.पटनाईक यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. केवळ तांत्रिक बाबींचा विचार करून न्यायालय याचिकेवर निर्णय घेणार नसून सज्जन कुमार यांना चौकशीला सामोरे जावे लागेल, असंही त्यांनी म्हटले आहे.
या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. जी.टी.नानावटी आयोगाने २००५ मध्ये सूचना केल्यानंतर पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जानेवारी २०१० मध्ये सीबीआयने या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. कनिष्ठ न्यायालयाने १९८४ च्या दंगलीतील आणखी एका गुन्हय़ात सज्जन कुमार यांची नुकतीच मुक्तता केली होती.