‘चले जाव’ चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बोलावलेल्या लोकसभेच्या विशेष सत्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या टीकेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी उत्तर देत सोनिया गांधी यांचे भाषण हे पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर सोनियांनी आपल्या भाषणात फक्त जवाहरलाल नेहरू यांचेच कौतूक केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या चळवळीत इतरांनीही योगदान दिले. मग नेहरूंच्याच नावाचा जप का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मृती इराणी यांनी बुधवारी आपल्या फेसबुक पेजवर एक मोठी पोस्ट लिहून सोनिया गांधी यांचा निषेध केला. चले जाव सारख्या देशव्यापी ऐतिहासिक आंदोलनाबाबत आमच्याकडून पक्षविरहीत विचार समोर ठेवण्याची अपेक्षा केली जाते. परंतु, सोनिया गांधी आपल्या दीर्घ भाषणात फक्त वर्ष २०१४ मधील काँग्रेसच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त करताना दिसून आल्या. त्यांनी चले जाव आंदोलनाबाबत फक्त नेहरूंचीच बाजू मांडली. या आंदोलनात फक्त नेहरूंचेच योगदान असल्याचे सांगण्यात आले. पण महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस सारख्या नेत्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी अवाक्षरही काढला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्मृती इराणींनी मोठे कौतूक केले. पंतप्रधानांनी या आंदोलनात महात्मा गांधींकडून घेण्यात आलेल्या ‘करेंगे या मरेंगे’ ही शपथ सर्वांनी घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्या योगदानाची माहिती देताना महिलांनीही या आंदोलनात कशी महत्वाची भूमिका निभावली होती, याचा उल्लेख त्यांनी केला.

मोदींच्या अभिभाषणात प्रगतीशीलता होती. तर सोनिया गांधींनी आपल्या जुन्याच उत्साहहीन गोष्टींचा पुनरूच्चार केला. सोनियांचे भाषण हे एका निवडणुकीतील प्रचारसभेप्रमाणे होते. त्यामुळे सभागृहातील वातावरण दुषित झाले, अशी टीका त्यांनी केली.

सध्या देशात द्वेषाचे आणि बदल्याचे राजकारण केले जात आहे. यामध्ये खुला संवाद आणि चर्चेला स्थान नाही, अशा शब्दांत सोनियांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे आज धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती धोक्यात आली आहे. यालाच विभाजनाचे राजकारण म्हणतात. जर आपल्याला आपले स्वातंत्र टिकवायचे असेल तर आपल्याला अशा विरोधी शक्तींचा मुकाबला करायला हवा, असे म्हणत देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता, त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या चले जाव चळवळीलाही विरोध केला होता. अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani slams congress president sonia gandhi on her comment on quit india movement 75th anniversary in parliament
First published on: 10-08-2017 at 13:39 IST