Snake Sightings Surge in Delhi: दिल्लीमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नैसर्गिक अधिवासात असलेले साप आता बाहेर पडू लागले आहेत. मानवी वस्तीत ठिकठिकाणी साप आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नुकतेच एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात किचनपर्यंत साप गेल्याचीही घटना घडली. दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलास या परिसरातील एका इमारतीमधून वाइल्डलाइफ एसओएस इमर्जन्सी हेल्पलाइनच्या मदतीने एका बिनविषारी धामण सापाला पकडण्यात आले. इमारतीमधील रहिवाशांना हे दृश्य दुर्मिळ वाटत असले तरी राजधानी दिल्लीत आता ही नित्याची बाब झाली आहे.

पूरग्रस्त परिस्थिती आणि जमिनीवर दीर्घ काळ पाणी साचून राहिल्यामुळे बिळातील साप कोरड्या भागात आश्रय घेत आहेत. अशावेळी निवासी घरे, शाळा, गोदामे आणि सरकारी इमारतींमध्ये ठिकठिकाणी सापांचे दर्शन होत आहे. वाइल्डलाइफ एसओएसच्या कम्युनिकेशन्स संचालक सुविधा भटनागर यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना म्हटले की, पावसाळ्याच्या हंगामात साप अनेकदा कोरड्या जागेच्या शोधात निवासी भागात येत असतात.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानीही साप आढळला

गेल्या आठवड्यात वाइल्डलाइफ एसओएसने दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक साप पडकले आहेत. जेएनयूच्या कँटिनमधून विषारी नागाला बाहेर काढण्यात आले. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानीही अशीच एक घटना घडली. याठिकाणी एक धामण आढळून आली, त्यानंतर तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

अशाचप्रकारे ग्रेटर नोएडामध्ये एका कपाटातून कोब्रा जातीचा साप बाहेर काढण्यात आला. तर गाझियाबादच्या राज नगर एक्सटेंशनमध्ये क्रिकेट प्रॅक्टिस जाळीत अडकलेला सात फूट लांबीचा धामण जातीचा साप बाहेर काढण्यात आला. पश्चिम विहार, बुरारी आणि छतरपूरमध्येही वाइल्डलाइफच्या पथकाने अनेक सापांना नागरी वस्तीतून बाहेर काढले.

साप दिसण्याचे प्रकार फक्त दिल्लीपुरतेच मर्यादीत नाही. यावर्षी जून ते जुलैच्या मध्यापर्यंत आग्रा येथे १०० हून अधिक साप दिसण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच वाइल्डलाइफकडे बचावासाठी फोन आले आहेत. यानंतर एनजीओमार्फत ३४ धामण, २३ कोब्रा आणि २१ कवड्या जातीचे साप पकडण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाइल्डलाइफ एसओएस प्रोटोकॉलनुसार, सरपटणाऱ्या प्राण्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. जर ते निरोगी असल्याचे आढळले तर ते मानवी वस्तीपासून दूर असलेल्या योग्य वन्य अधिवासात सोडले जातात. आपल्या नागरी परिसरात साप दिसण्यापासून रोखायचे असतील तर आसपासचा परिसर स्वच्छ आणि उंदीरमुक्त ठेवण्याची, गटारे सव आणि जमिनीवर पडल्या भागा बुजवून टाकण्याचा सल्ला वाइल्डलाइफ संस्थेकडून देण्यात आला आहे.