सोहराबुद्दीन चकमक खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाच्या बदलीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. सोहराबुद्दीन प्रकरणामुळे आणखी एका न्यायाधीशाची बदली, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची न्या. रेवती मोहिते – डेरे यांच्यासमोर सुनावणी सुरु होती. गेल्या तीन महिन्यांपासून या खटल्याशी संबंधित याचिकांवर त्या सुनावणी करत होत्या. मात्र न्या. डेरे यांची नुकतीच तडका फडकी बदली करण्यात आली. ही बदली नियमित प्रक्रियेचा एक भाग असल्याचे स्पष्टीकरण आता दिले जात आहे. डेरे यांच्या जागी न्या. सांब्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन आयपीएस अधिकाऱ्यांना दोषमुक्त केल्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सोहराबुद्दीनचा भाऊ रूबाबुद्दीन याने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. न्यायमूर्तींनी सीबीआयला फटकारले होते. साक्षीदार ‘फितूर’ होत असताना सीबीआय मूग गिळून गप्प का, साक्षीदारांच्या संरक्षणाची, त्यांनी नीडरपणे न्यायालयात साक्ष देण्याची जबाबदारी सीबीआयची नाही का अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली होती.
न्या. डेरे यांच्या बदलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन भाजपा सरकारवर निशाणा साधला. सोहराबुद्दीनप्रकरणात आणखी एका न्यायाधीशाची बदली झाली. सीबीआयला आव्हान देणाऱ्या न्या. डेरे यांची बदली झाली. अमित शहांना हजर राहण्यास सांगणाऱ्या न्या. जे टी उत्पत यांची बदली झाली. तर या प्रकरणावरुन कठीण प्रश्न विचारणाऱ्या न्या. लोया यांचा मृत्यू झाला, असे ट्विट करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
The Sohrabuddin case claims yet another Judge.
Justice Revati Dere, who challenged the CBI has been removed.
Judge J T Utpat, asked Amit Shah to appear and was removed.
Judge Loya asked tough questions. He died. #HowDidLoyaDie? https://t.co/iNFLVIEQni
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 27, 2018