वीस रुपये देण्यास नकार दिला म्हणून एका मुलानं आपल्या जन्मादात्या आईची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील जयसिंगपूर गावात हा प्रकार घडला आहे. ही घटना उघड झाल्यानंतर आसपासच्या गावकऱ्यांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपी मुलाला अंमली पदार्थांचे व्यसन होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी मुलाला अटक केली आहे. सदर आरोपीविरोधात हरियाणा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
नेमकं घडलं काय?
जमशेद असं आरोपी मुलाचं नाव आहे. एनडीटीव्हीने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी जमशेद त्याची आई रजियासोबत गावातल्या त्यांच्या मालकीच्या घरात राहात होता. आरोपीच्या वडिलांचं फक्त चारच महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. यानंतर घरची सर्व जबाबदारी आईने उचलली होती. जमशेदला अंमली पदार्थांचं व्यसन होतं. गेल्या अनेक महिन्यांपासून तो मोठ्या प्रमाणावर गांजा व अफूचं व्यसन करत होता.
रविवारी संध्याकाळी जमशेद नशेत असताना त्याचं आई रजिया यांच्याशी भांडण झालं. जमशेदनं आईकडे २० रुपये देण्याची मागणी केली. पण रजिया यांनी जमशेदच्या व्यसनामुळे त्याला पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. जमशेदला संताप अनावर झाला. त्यानं रागाच्या भरात घरातली कुऱ्हाड आईच्या डोक्यात घातली. या हल्ल्यात रजिया यांचा जागीच मृत्यू झाला.
रात्रभर मृतदेह घरात असताना झोपून राहिला!
दरम्यान, जमशेदच्या चौकशीदरम्यान धक्कादायक बाब समोर आली. आईची हत्या केल्यानंतर जमशेद तिथेच घरात झोपून गेला. रात्रभर आईचा मृतदेह तशाच अवस्थेत पडून असताना जमशेद मात्र निवांत झोपला होता. सकाळी आसपासच्या लोकांनी विचारणा केली असता हा प्रकार उघड झाला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.