Raj Kushwah Sonam Raghuvanshi Inquiry: इंदोरच्या राजा रघुवंशीची मेघालयमधील शिलाँग येथे हत्या झाली असून त्याची पत्नी सोनम रघुवंशीनंच राज कुशवाहसोबत मिळून हत्येचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यासंदर्भात आता सोनम रघुवंशी व राज कुशवाह यांची पोलीस कोठडीत चौकशी चालू असून त्यातून अनेक बाबी पोलिसांसमोर उघड होत आहेत. एकीकडे सोनम रघुवंशी व राज कुशवाह यांचं नेमकं काय नातं आहे? याची चौकशी पोलीस करत असताना दुसरीकडे नेमकं जिथे राजाची हत्या झाली, तिथपर्यंत हे सगळे कसे पोहोचले? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
या दोघांची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशी व राज कुशवाह या दोघांनीही चौकशीदरम्यान आपण राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचल्याचा दावा फेटाळला आहे. तसेच, आता हे दोघे एकमेकांवरच आरोप करू लागले आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनास्थळी नेमकं काय घडलं?
पोलीस सध्या सोनम रघुवंशी, राज कुशवाह यांच्यासह राजाच्या हत्येची सुपारी देण्यात आलेल्या चार आरोपींची चौकशी करत आहेत. त्यातून राजाच्या हत्येवेळी घटनास्थळी नेमकं काय घडलं? यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली आहे. त्यानुसार, सुपारी देण्यात आलेल्या मारेकऱ्यांपैकी एक आरोपी विशालनं आधी राजाच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला. आपल्याला फोटो काढायचा आहे, असं सांगून सोनम रघुवंशी स्वत: राजाला त्या ठिकाणी घेऊन गेली होती, अशीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
मारेकऱ्यांनी काय सांगितलं?
पोलीस तपासात मारेकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी राजा रघुवंशीचा मृतदेह फेकण्यासाठी सोनमचीच मदत घेतली. त्यानंतर ते स्कूटरवर एकत्रच तिथून निघाले आणि पुढे वेगवेगळ्या मार्गांनी ठरलेल्या ठिकाणी निघून गेले. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख हर्बर्ट पायनियाड खारकोंगोर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत सर्व आरोपींची उलटतपासणी घेण्यात आली. आरोपींमध्ये झालेलं पैशांचं हस्तांतरण, हत्येचा कट कसा रचण्यात आला यासंदर्भात अद्याप माहिती गोळा केली जात आहे.

आरोपींना सोहरा भागात नेलं जाणार
दरम्यान, सर्व आरोपींना ज्या ठिकाणी राजा रघुवंशीची हत्या झाली, तिथे पुन्हा नेलं जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींना तिथे नेऊन हत्येची घटना रीक्रिएट केली जाणार आहे. यासाठी पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयाकड आरोपींच्या आठ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. आता सर्व आरोपींना पुढच्या काही दिवसांत सोहरा या भागात नेलं जाणार आहे.
पोलिसांकडे नेमके कोणते पुरावे?
आत्तापर्यंत पोलिसांना सोनम रघुवंशीचं मंगळसू्त्र, जोडवे, त्यांच्या बॅगा, राजाच्या मृतदेहाजवळ सापडलेली दाव, रक्ताळलेले कपडे, सोनम व राजा यांचं सोबत फिरतानाचं सीसीटीव्ही फूटेज, अनेक साक्षीदारांचे जबाब, या दोघांना मारेकऱ्यांसोबत पाहिलेल्या गाईडची साक्ष असे अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.
घटनास्थळापर्यंत ते पोहोचले कसे?
दरम्यान, सोनम व राजासह मारेकरी जिथे हत्या झाली तिथपर्यंत कसे पोहोचले? याचा पोलीस तपास करत आहेत. “ते अशा मार्गाने तिथपर्यंत पोहोचले, जिथून सामान्यपणे स्थानिक ग्रामस्थ किंवा पर्यटक जात नाहीत. दोन गटांमधील तणावाचा तो भाग आहे. त्यामुळे या भागाची रेकी मारेकऱ्यांनी कशी केली आणि तिथे कसे पोहोचले याचा आम्ही तपास करत आहोत”, अशी माहिती पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
राजा रघुवंशी हत्येचं नेमकं प्रकरण काय?
सोनम रघुवंशीचा ११ मे रोजी राजाशी विवाह झाला होता. २० मे रोजी ते दोघे शिलाँगला जाण्यासाठी निघाले. आधी गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. २२ मे रोजी रात्री त्यांचं कुटुंबीयांशी बोलणंदेखील झालं. मात्र २३ तारखेपासून दोघे बेपत्ता झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीत सापडला. त्यानंतर सोनमच्या शोधासाठी प्रयत्न सुरू झाले. ८ जून रोजी उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये एका ढाब्यावर सोनम सापडली. विशेष म्हणजे आपण तिथे असल्याचं तिने स्वत:च फोन करून कळवलं होतं. त्यानंतर चार मारेकऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली.