भारतानं नुकताच १०० कोटी करोना लसींचा टप्पा पार केला. यावरून केंद्र सरकारवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकारने गंभीर चुका केल्याचा फटका देशाला भोगावा लागल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. एका हिंदी दैनिकात त्यांनी लिहिलेल्या “हम कैसे भूल जाएंगे वो दौर” या लेखामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्यावर टीका केली आहे. तसेच, करोना काळात झालेल्या जीवितहानीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे.

सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रामध्ये करोना काळात देशभर आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केल आहे. मात्र, त्याचसोबत त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली आहे. “मोदी सरकारने करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दाखवलेल्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने अवलंबलेलं धोरण दु:खद आणि दुर्दैवी आहे. देशात जेव्हा करोनाची दुसरी लाट सर्वोच्च बिंदूवर होती, तेव्हा मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सातत्याने लोकांचे जीव जात होते. त्यामुळे इतक्या वेळा इशारा देऊन देखील एखादं सरकार इतकं निष्क्रिय कसं राहू शकतं हे समजण्याच्या पलीकडचं आहे”, असं सोनिया गांधींनी या लेखात म्हटलं आहे.

वैज्ञानिकांचं अभिनंदन, पण…

दरम्यान, या लेखात सोनिया गांधींनी देशात १०० कोटी लसीकरण झाल्याबद्दल वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे. पण त्याचं श्रेय मोदी सरकारला देण्यास त्यांनी नकार दिला आहे. “जर आज आपण १०० कोटी लसीचे डोस देण्यात यशस्वी ठरलो आहोत, तर त्याचं श्रेय डॉक्टर, नर्स आणि लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आहे. लसीची व्यवस्था आणि वितरण करण्यात अयशस्वी ठरलेल्या सरकारमधील लोकांना त्याचं श्रेय जात नाही”, असं सोनिया गांधींनी नमूद केलं आहे.

“दुसऱ्या लाटेत मोदी-शाह झाले गायब”

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गायब झाले होते, असं त्या म्हणाल्या आहेत. “त्या भीषण काळात पंतप्रधान आणि गृहमंत्री गायब झाले होते, पण जशी करोनाची परिस्थिती सुधारली, ते पुन्हा समोर आले. पहिल्या लाटेदरम्यान अचानक लॉकडाउनची घोषणा करून मजुरांना वाईट अवस्थेवर सोडून देण्यात आल्यासारखाच हा प्रकार आहे”, असं देखील सोनिया गांधी यांनी या लेखात म्हटलं आहे.

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी स्थानिक धर्मगुरूंची मदत घ्या” ; नरेंद्र मोदींचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाविरुद्धचा लढा की इव्हेंट मॅनेजमेंट?

आपल्या लेखात सोनिया गांधींनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “मोदी सरकार अदूनही करोनाविरोधातल्या लढ्याला इव्हेंट मॅनेजमेंटची संधी समजत आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी २ कोटींहून जास्त लसीकरण झालं, पण हे रोज का होऊ शकत नाही? कारण वाढदिवसाच्या आधी लसींची साठेबाजी केली गेली”, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.