करोनाचा फटका बसल्याने मागील दोन वर्षांपासून भारतातून अमेरिक होणारी आंब्यांची निर्यात यंदाच्या वर्षीपासून पूर्वव्रत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या आंबे विक्री प्रदर्शनामध्ये आंब्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश असणारी एक पेटी थेट राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आयोजक करत आहेत.

करोनामुळे मागील दोन वर्षांपासून आंब्यांची निर्यात ठप्प झाली होती. पुण्यातील रेनबो इंटरनॅशनल या आंब्याच्या निर्यातदार कंपनी पाच प्रकारचे आंबे अमेरिकेत निर्यात करते. यामध्ये केसरी, हापूस, गोवा मानकूर हे महाराष्ट्रातील, तर हिमायत आणि बैंगनपाली या आंध्र प्रेदेशातील आंब्यांचा समावेश आहे. हे आंबे व्हाइट हाऊसमध्ये पाठवले जाणार असल्याचं रेनबो इंटरनॅशनलचे निर्देशक ए. सी. भासले यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलतना सांगितलं. सोमवारी हे आंबे अमेरिकेला पाठवण्यात आल्याचंही ते म्हणाले.

रेनबो इंटरनॅशनल ही कंपनी बारामतीमधील असल्याने बारामतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात आनंद व्यक्त केलाय. “जळोची, बारामती येथील रेनबो इंटरनॅशनल यांनी पाठविलेले आंबे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांना पाठविण्यात आलेल्या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकूर या आंब्याचा समावेश आहे,” असं सुप्रिया यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. पुढे बोलताना त्या म्हणतात, “महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा.”

करोनामुळे अमेरिकेतील तज्ज्ञ आंब्यांची क्षमता तपासण्यासाठी येऊ शकत नसल्याने मागील दोन वर्षांपासून आंब्यांची निर्यात बंद होती. मात्र आता आंब्यांची निर्यात पुन्हा सुरु झाली असून सध्या अमेरिकेत केसरीपेक्षा हापूसला चांगली मागणी असल्याचं निर्यातदार सांगतात.