नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आणि त्यायोगे कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणामुळे माणसाचा बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होतो. शिक्षण हे समाज प्रबोधनाचे एक उत्तम माध्यम आहे. अठराव्या शतकात शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या आनंदीबाई जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. आणि त्यांना आज गुगलने ३१ मार्च रोजी त्याच्या जन्म दिवसाचे निमित्त साधुन मानवंदना दिली आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा हक्कच नव्हता. त्या काळात सामाजिक व कौटुंबिक विरोधावर मात करत अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत प्रगतीच्या दिशेने उचललेले एक क्रांतिकारी पाऊल म्हणजे आनंदीबाई होय.

त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात एका सधन कुटुंबात झाला होता. परंतु तत्कालीन रुढी परंपरानुसार वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्या वयापेक्षा तब्बल २० वर्ष मोठ्या गोपाळराव जोशी यांच्याशी करण्यात आला. स्वत: शिक्षित असल्यामुळे गोपाळराव अठराव्या शतकातील भारतीय विचारधारेपेक्षा बरेच पुढारलेले होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले. पुढे प्राथमिक शिक्षण सुरु असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला. दरम्यान त्यांचे शिक्षण काहीसे बारगळले. परंतु वैद्यकिय सुविधांच्या अभावामुळे त्यांचे ते मुल काही जगू शकले नाही. आणि या घटनेचा गोपाळरावांच्या मनावर पार खोलवर परिणाम झाला. आणि अशी वेळ इतर दुसऱ्या कोणावर येऊ नये यासाठी आनंदीबाईंनाच तंत्रशुद्ध वैद्यकिय शिक्षण देण्याचा निर्णय गोपाळरावांनी घेतला. परंतु उच्च शिक्षणाच्या योग्य सोयी भारतात नसल्यामुळे आनंदीबाईंना शिक्षणासाठी थेट अमेरिकेत पाठवण्याचा घाट गोपाळरावांनी घातला.

पुढे ४ जून १८८३ साली आनंदीबाई उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पोहोचल्या. परदेशात जाउन शिक्षण घेणाऱ्या भारतीय इतिहासातील पहिल्या महिला होण्याचा मान यामुळे आनंदीबाईंना मिळाला. अत्यंत हिन दर्जाची वागणूक आणि प्रचंड हाल अपेष्टा सहन करुन त्या अमेरिकेत तर पोहोचल्या परंतु बौद्धिक व वैचारिकदृष्ट्या पुढारलेल्या अमेरिकन समाजानेही त्याचा मानसिक छळ सुरुच ठेवला. परंतु आनंदीबाईंचे मनोधैर्य तुटले नाही. त्यांनी पेंसिलवेनिया मधील महिला वैद्यकिय महाविद्यालयात अत्यंत आत्मविश्वासाने आपले शिक्षण सुरु ठेवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहता पाहता आपली जिद्द, मेहनत, चिकाटी आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर ११ मार्च १८८६ रोजी त्यांनी वैद्यकिय पदवी मिळवत भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. पुढे १८८६ साली त्या भारतात परतल्या. आणि कोल्हापुरातील एल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये काम करण्यास सुरवात केली. त्यांनी आपल्या ज्ञानाची चुणुक दाखवण्यास सुरवात केलीच होती. पंरतु त्यांची किर्ती सर्वदूर पसरण्याआधीच २६ फेब्रुवारी १८८७ साली वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आनंदीबाईंचा थक्क करणारा प्रवास हा प्रतिकुल परिस्थितीतुन प्रगतीच्या दिशेने जाउ इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या पहिल्या महिला डॉक्टरला लोकसत्ताचाही मानाचा मुजरा!