नवी दिल्ली, हैदराबाद, तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने बनविलेल्या माहितीपटावरून देशभरातील डाव्या विचासरणीच्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचे मंगळवारी दिसले. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात या माहितीपटाचे सादरीकरण केले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच विद्यापीठातील वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले. दुसरीकडे केरळ आणि तेलंगणातील काही विद्यापीठांमध्ये हा माहितीपट दाखविण्यात आल्याने भाजपने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेएनयूमध्ये ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट दाखविण्याची तयारी जवाहरलाल नेहरू स्टुडंट्स युनियनने केली होती. डीएसएफ, एआयएसए, एसएफआय आणि एआयएसएफ या चार डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांची ही शिखर संघटना आहे. मात्र माहितीपटाचे सादरीकरण केले जाण्यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने इंटरनेट आणि वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचे अ‍ॅप्लिकेशन वापरून हा माहितीपट ‘डाऊनलोड’ केला असून तो विद्यार्थ्यांमध्ये वितरित केला जात असल्याचे एआयएसएचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. साई बालाजी यांनी सांगितले.

दुसरीकडे तेलंगणामधील हैदराबाद विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने माहितीपटाचे सादरीकरण केले. यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नसून विद्यापीठ प्रशासनाने यावर अहवाल मागविला आहे. २१ जानेवारीलाच हा माहितीपट विद्यापीठ परिसरात दाखविला गेल्याची माहिती विद्यापीठाचे निबंधक देवेश निगम यांनी सांगितले. तर केरळमधील अनेक विग्यापीठांमध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने मंगळवारी माहितीपट दाखविला. त्यावर भाजप युवा आघाडीने टीका केली असून त्याविरोधात मोर्चे काढण्यात आले. राजधानी तिरुवनंतपूरमसह काही भागांमध्ये यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पाण्याचा फवारा आणि अश्रुधुराचा मारा करून कार्यकर्त्यांना पांगविले. दुसरीकडे, माजी केंद्रीय मंत्री आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल यांनी माहितीपटाच्या अशा सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली.

सत्य उजळून निघतेच – राहुल गांधी

कोणत्याही प्रकारची बंदी, दडपशाही किंवा नागरिकांना घाबरवून सत्य दडपता येत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. जम्मू येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत गांधी म्हणाले, की सत्य लपवता येत नाही असे भगवद्गीता, उपनिषदे या आपल्या ग्रंथात लिहिल्याचे आढळेल. उघड होण्याची सत्याला वाईट खोड असते आणि ते कधीतरी उजळून निघतेच असे गांधी म्हणाले.

अमेरिकेने हाट झटकले

‘बीबीसी’च्या माहितीपटाबाबत कल्पना नाही. मात्र, अमेरिका व भारतातील समान धागा असलेल्या लोकशाही मूल्यांची आपणांस पूर्ण जाणीव असल्याचे सांगत अमेरिकेच्या परराष्ट्र विभाग प्रवक्त्याने वादावर थेट भाष्य करण्यास नकार दिला. एका पाकिस्तानी पत्रकाराने याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर नेड प्राइस म्हणाले, की अमेरिका व भारत या दोन्ही देशांची लोकशाही मूल्यांवर आधारित विलक्षण दृढ संबंध आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students union aggressive over bbc documentary on narendra modi zws
First published on: 25-01-2023 at 02:22 IST