SC Judge Abhay Oka Retired: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक २३ मे २०२५ रोजी निवृत्त झाले. नवी दिल्लीत त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यासह अनेक न्यायाधीश व ज्येष्ठ वकील, सरकारी वकील उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात न्यायमूर्ती अभय ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. न्यायमूर्तींनी न्यायदानाची जबाबदारी पार पाडताना कशा प्रकराचं वर्तन ठेवायला हवं, यासंदर्भात त्यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात उल्लेख केला.
काय म्हणाले न्यायमूर्ती अभय ओक?
सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती अभय ओक यांनी एका माजी न्यायमूर्तींनी त्यांना दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख केला. “मी कदाचित दोन वकिलांना दुखावलं असेल. पण मला वाटतं की न्यायाधीशांनी अतिशय ठाम असायला हवं. त्याचबरोबर, एखाद्या न्यायमूर्तींनी आपल्या निर्णयामुळे कुणी दुखावेल का याचा विचार करता कामा नये. एका महान न्यायमूर्तींनी मला एकदा सल्ला दिला होता की तू लोकप्रिय होण्यासाठी न्यायाधीश झालेला नाहीस. मी त्या गोष्टीचं पूर्ण पालन केलं”, असं न्या. ओक म्हणाले. “पण मी फक्त राज्यघटनेचं पालन करतानाच कठोर वागलो”, असंही त्यांनी नमूद केलं.
‘निवृत्ती’ शब्दाचा मला तिटकारा – न्या. अभय ओक
दरम्यान, न्यायमूर्ती अभय ओक यांनी निवृत्ती या शब्दाचा आपल्याला तिटकारा असल्याचं नमूद केलं.”मला निवृत्ती शब्दाचा तिटकारा आहे. त्यामुळेच मी या वर्षी जानेवारी महिन्यापासूनच शक्य तितक्या प्रकरणांची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता”, असं ते म्हणाले.
न्यायमूर्ती अभय ओक यांनी शुक्रवारी २३ मे रोजी त्यांच्या शेवटच्या दिवशी ११ प्रकरणांमध्ये निकाल दिले. याआधी २१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातदेखील त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडली होती. “न्यायमूर्तींनी निवृत्तीआधी शेवटच्या दिवशी काम न करण्याची प्रथा मला अमान्य आहे”, असं ते म्हणाले होते.
न्यायमूर्ती अभय ओक यांचा परिचय…
न्यायमूर्ती अभय ओक यांचा जन्म २५ मे १९६० रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि १९८३ साली त्यांनी वकिलीची सनद घेतली. त्यांनी ठाणे कोर्टातील वडील श्रीनिवास ओक यांच्या चेंबरमधून वकिली सुरू केली. १९८५-८६ साली मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती व्ही. पी. टिपणीस यांच्या चेंबरमध्ये ते रुजू झाले. २९ ऑगस्ट २००३ रोजी त्यांना अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून मुंबई उच्च न्यायालयात बढती देण्यात आली. १२ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांना पूर्णवेळ न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं.
१० मे २०१९ रोजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ ग्रहण केली. पुढे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून बढती मिळेपर्यंत अभय ओक हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आलं.