Swachh Survekshan Result 2025 : इंदूरने सलग आठव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला आहे. खरं तर इंदूरने सलग आठवेळा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा दर्जा कायम ठेवल्यामुळे तेथील प्रशासनाचं कौतुक करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी (१७ जुलै २०२५) स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ या वर्षासाठीच्या पुरस्कारांचं वितरण कपण्यात आलं आहे. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नव्याने समाविष्ट केलेल्या सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीत इंदूरने बाजी मारत इंदूरला सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

दरम्यान, दहा लाख लोकसंख्येच्या श्रेणीत इंदूर सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात गुजरातमधील सुरत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशातील विजयवाडाचा क्रमांक लागतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

विटा व पाचगणीचाही समावेश

तसेच या वर्षी नोएडा, नवी दिल्ली महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील विटा व पाचगणीचाही समावेश आहे. ही अनुक्रमे तीन शहरे १० लाख लोकसंख्या श्रेणी, ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या, २० हजार ते ५० हजार लोकसंख्या आणि २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या श्रेणीतील शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहरे ठरली आहेत. दरम्यान, हा स्वच्छ शहराचा किताब २०१६ पासून दरवर्षी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित केला जातो.

पिंपरी-चिंचवड देशात सातवा क्रमांक

केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक पटकावला आहे. तर, राज्यात पहिला क्रमांक आला आहे. गतवर्षी पिंपरी-चिंचवड शहराचा देशात १३ वा तर राज्यात तिसरा क्रमांक आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, हे पुरस्कार १० सुस्पष्ट पॅरामीटर्सवर आधारित होते. त्यामध्ये ५४ निर्देशक आहेत, जे शहरांमधील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे संपूर्ण दृश्य देतात. पुरस्कारांमध्ये सार्वजनिक सहभागासह १४ कोटी लोकांना प्रत्यक्ष संवाद, स्वच्छता अॅप, MyGov आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सहभागी करून घेण्यात आलं होतं. “सुपर लीग” श्रेणी ही एक नवीन श्रेणी आहे. या श्रेणीत गेल्या तीन वर्षांत किमान एकदा तरी पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवलेली आणि या वर्षात त्यांच्या संबंधित लोकसंख्येच्या टॉप २० टक्के श्रेणीत राहिलेली शहरे समाविष्ट आहेत.