Kanpur Ashram Gangrape: उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या आश्रमात एक धक्कादायक घटना घडल्याचा दावा केला जात आहे. येथील आश्रमात एका राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. कथित अत्याचार जानेवारी महिन्यात झाला होता. मात्र तब्बल चार महिन्यांनंतर या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस सदर घटनेचा तपास करत आहेत. तसेच या प्रकरणात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याचीही चौकशी केली जात आहे.
कानपूरमधील गोविंद नगर येथे राहणाऱ्या पीडितेने सदर प्रकाराची माहिती देताना पोलिसांना सांगितले की, जुने कपडे विकण्याचे दुकान थाटण्यासाठी ती जागा शोधत होती. या कामानिमित्त ती गोविंद महतो या स्थानिक माणसाच्या संपर्कात आली. महतोने तिला जागा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. जागा मिळवून देण्यासाठी मोठ्या आणि प्रभावशाली लोकांशी ओळख करून देण्यासाठी तिला आश्रमात नेले.
पीडितेने आरोप केला की, आश्रमात गेल्यानंतर तिला लाडू खाण्यास दिला. तो खाल्ल्यानंतर ती बेशुद्ध पडली. यानंतर आश्रमाचे महंत महतो आणि इतर अनेकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात पीडितेने आश्रमातील पुजाऱ्यासह चार जणांची नावे घेतली आहेत.
आरोपींचे कथित राजकीय लागेबंधे असल्यामुळे तात्काळ तक्रार दाखल करण्यासाठी तिला भीती वाटत होती. म्हणून चार महिन्यांचा काळ लागला, असे कारण पीडितेने पुढे केले आहे. तसेच आश्रमाच्या परिसरात एक वृद्ध व्यक्ती पीडितेला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, हा व्हिडीओही पीडितेने पोलिसांना दिला.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त महेश कुमार यांनी तक्रार दाखल करून घेतल्याचे सांगितले आहे. सदर महिलेने तक्रार दिल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली. तसेच पीडितेने दिलेला व्हिडीओही पाहिला. यानंतर आम्ही आश्रमातील त्या जागेला भेट दिली. सदर प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान पीडितेच्या आरोपांना आश्रमातील पुजाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. त्यांनी म्हटले की, पीडितेने ज्यावेळच्या घटनेचा उल्लेख केला, तेव्हा ते प्रयागराजमधील कुंभमेळ्यासाठी गेले होते. यासाठी त्यांनी कुंभमेळ्यातील फोटो आणि व्हिडीओही सादर केले. या दाव्याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.