Suicide Bomber Rammed Explosive Vehicle Into Pakistani Military Convoy: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात शनिवारी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात किमान १६ सुरक्षा अधिकारी ठार झाले होते. यानंतर पाकिस्तानने या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले होते. पण भारताने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावले होते. अशात, आता पाकिस्तान तालिबानच्या हाफिज गुल बहादूर शाखेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान, पाकिस्तानने या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्याला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्र्यालयाच्या सचिवांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटेल आहे की, “२८ जून रोजी वझिरीस्तान आत्मघातकी हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरणारे पाकिस्तानी लष्कराचे अधिकृत निवेदन आम्ही पाहिले. आम्ही हा आरोप स्पष्टपणे नाकारतो.”

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात शनिवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान १६ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती लष्कराच्या मीडिया शाखेने दिली होती.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने म्हटले होते की, “दहशतवाद्यांनी नियोजित आणि नियोजनबद्ध केलेल्या भ्याड हल्ल्यात उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील मीर अली येथील सुरक्षा दलांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले.”

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी या आत्मघातकी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

ही घटना अलिकडच्या काही महिन्यांतील उत्तर वझिरीस्तानमधील सर्वात प्राणघातक घटनांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यामुळे या प्रदेशातील सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

२०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यापासून पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होत आहेत.

पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर त्यांच्याविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जात आहे, परंतु तालिबानने हे आरोप सातत्याने नाकारले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या वर्षी मार्चमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते आणि त्यांनी मोठ्या संख्येने पाकिस्तान सैन्याच्या जवानांना ठार केल्याचा दावा केला होता.