Taslima Nasreen : बांगलादेशच्या सुप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen ) यांनी बांगलादेशमधली स्थिती, दहशतवाद, स्त्रियांची अवस्था यावर भाष्य केलं आहे. दहशतवाद हा एका दिवसात जन्माला येत नाही आधी धर्मांधता जन्माला येते असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे तस्लिमा नसरीन यांनी?

शेख हसीना यांनी ज्या प्रकारे बांगलादेश सोडला तसं त्या करतील असं मला वाटलं नव्हतं. तसंच त्या पंतप्रधान पद सोडतील असंही वाटलं नव्हतं. त्यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी शेख हसीना तिथे असत्या तर त्यांची हत्या झाली असती. आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता. मात्र आम्हाला हे ठाऊक नव्हतं की विद्यार्थ्यांचा प्यादं म्हणून वापर करणारे लोक वेगळे आहेत. जर शेख हसीना यांच्यावर राग होता तर मग मुजीबुर्ररहमान यांचे पुतळे का तोडले? आग का लावली? या सगळ्यामागे एक विशिष्ट विचारसरणीने काम करणारा इस्लामी ग्रुप होता असं तस्लिमा नसरीन म्हणाल्या. तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen ) यांनी आज तकला मुलाखत दिली आहे त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.

हे पण वाचा- Taslima Nasreen Residence Permit: “…तर मी नक्की मरेन”, सुप्रसिद्ध लेखिका तसलिमा नसरीन यांचं धक्कादायक विधान; म्हणाल्या, “गेल्या दीड महिन्यापासून…”!

माझे वडील धर्म मानत नव्हते, घरात सेक्युलर वातावरण होतं

तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen ) यांना त्यांच्या बालपणाविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या, “मी लहान होते तेव्हापासून मला आठवतं आहे. माझे वडील धर्म वगैरे मानत नव्हते. ते ईद साजरी करायचे. पण नमाज पठण करत नव्हते. आई सांगायची कुराण वाच, नमाज पठण कर. मी आईला विचारायचे की मी ते का वाचू? ते फारसी भाषेत आहे. मी जेव्हा १४ ते १५ वर्षांची होते तेव्हा मला बांगला भाषेतील कुराण मिळालं. मी जेव्हा ते वाचलं तेव्हा महिलांबाबत त्यात म्हटलंय ते मला कळलं. असंही तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen ) म्हणाल्या

दहशतवाद एका दिवसात जन्माला येत नाही

८० च्या दशकापर्यंत धर्माची चर्चा इतक्या मोठ्या प्रमाणावर होत नव्हती. मशिदीत फक्त म्हातारी माणसं जायची. आता लहान मुलं, तरुण सगळेच जात आहेत. रोड बंद करुन नमाज पठण होतं. त्यामुळेच माझं हे ठाम मत आहे की दहशतवाद एका दिवसात जन्माला येत नाही. आधी धर्मांधता जन्मते, त्यानंतर कट्टरतावाद जन्माला येतो आणि मग दहशतवाद जन्म घेतो. त्यासाठी दीर्घ काळ इस्लामी पद्धतीने ब्रेनवॉश केला जातो.” असं परखड मत तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen ) यांनी मांडलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मदरशांची गरज नाहीच हे मी चाळीस वर्षांपासून सांगते आहे

आपल्याला मदरशांची गरज नाही हे मी मागच्या ४० वर्षांपासून सांगते आहे. धर्म घरात शिकवा आणि शिक्षण शाळेत. मशिदी बांधण्यापेक्षा चांगल्या शाळा, प्रयोगशाळा उभारा मुलांना विज्ञानापासून सगळे विषय शिकवा. काहीही झालं की मशिद बांधली जाते. हे धोरण बदललं पाहिजे. जेवढी सरकारं आली त्यांनी धर्मांधता वाढवली आहे, कट्टरपंथीयांना प्रोत्साहन दिलं आहे. असं करुन तुम्ही फक्त काही दिवस गादीवर बसाल, पण देशाचा यात काय फायदा? असा प्रश्नही तस्लिमा नसरीन यांनी उपस्थित केला.