‘एअर इंडिया’च्या सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली विमानात तांत्रिक बिघाड उद्भवल्यानंतर ते मंगोलियाची राजधानी उलानबटातर येथील विमानतळावर उतरविण्यात आले. प्रवासादरम्यान विमान कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाडाचा संशय आल्याचे ‘एअर इंडिया’ने निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीहून बंगळूरुला जाणारे ‘एअर इंडिया’चे विमान मंगळवारी तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर भोपाळला वळवले.

‘२ नोव्हेंबर २०२५ रोजी सॅन फ्रान्सिस्कोहून दिल्लीला जाणाऱ्या एआय-१७४ या विमानात तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर उलानबाटार आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरविण्यात आले. ‘एअर इंडिया’ने प्रवाशांना तत्काळ मदत केली आहे. विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांच्या राहण्यासाठी हॉटेलची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली,’ असे ‘एअर इंडिया’ने ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, ‘दिल्लीहून बंगळूरुला जाणारे ‘एआय२४८७’ विमान भोपाळ येथे सुरक्षितपणे उतरविण्यात आले. दुरुस्तीसाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. भोपाळ येथील आमच्या पथकाने प्रवाशांना मदत करत त्यांना इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत,’ असे ‘एअर इंडिया’च्या प्रवक्त्यांनी सांगितले.

२२८ प्रवाशांना परत आणण्याची व्यवस्था

उलानबाटारमध्ये अडकलेल्या २२८ प्रवाशांना परत आणण्यासाठी ‘एअर इंडिया’ विमान पाठविणार आहे. बुधवारी सकाळी हे विमान प्रवाशांसह परत येईल, असे ‘एअर इंडिया’तर्फे सांगण्यात आले.