Telangana Bandh Backward Castes Protest : मागसवर्गीयांच्या संघटनांनी पुकारलेल्या तेलंगणा बंदमुळे शनिवारी राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं. या बंदला अनेक मोठ्या राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला असल्यामुळे याची तीव्रता व व्यापकता वाढली. यामुळे राज्यभर व्यवसाय ठप्प होते, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक वाहतूक बंद झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील मागास जातींच्या ४२ टक्के आरक्षणाचा सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला. तसेच त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर राज्यभरातील वेगवेगळ्या मागास जातींच्या संघटनांनी बंद पुकारला.
मागास जाती संयुक्त कारवाई समिती (बीसी जीएएसी) या संघटनेने या बंदचं आयोजन केलं होतं. या बंदला सत्ताधारी काँग्रेस, विरोधी बाकावरील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि भारतीय जनता पार्टीचं समर्थन मिळालं. या बंदवेळी हैदराबाद व इतर प्रमुख शहरांमध्ये तोडफोड व दगडफेकीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर हल्ले झाले.
बस सेवा ठप्प
या बंदमुळे सरकारी बस सेवा प्रभावित झाली होती. तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या डेपोमध्येच उभ्या करण्यात आल्या होत्या. तसेच येथे सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, दिवाळीनिमित्त शहरांमधून आपापल्या गावी जाणारे, प्रवास करणारे प्रवासी बस डेपोंवर अडकून पडले होते. बसेस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.
राज्यव्यापी आंदोलन
हा विरोध उच्च न्यायालयाच्या ९ ऑक्टोबरच्या आदेशानंतर सुरू झाला होता, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागास जातींसाठी ४२ टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली होती. यावर मागास जातींच्या संघटनांनी व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यामुळे मागास जातींच्या संघटना व त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांचा संताप वाढला आणि यातून त्यांनी बंदची हाक दिली. या बंदला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बंदला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा
काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते, मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसचे पोन्नम प्रभाकर, वाकिटी श्रीहरी, सीतक्का, कोंडा सुरेखा, खासदार अनिल यादव यांनी हैदराबादमध्ये तर मंत्री तुम्मला नागेश्वर राव हे सत्टुपल्ली येथे आंदोलनात सहभागी झाले होते.