मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईदच्या साथीदाराची दिवसाढवळ्या गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मुफ्ती कैसर फारूक असं हत्या झालेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख नेता होता. तसेच तो हाफिज सईदचा अत्यंत जवळचा साथीदार होता. पाकिस्तानातील कराची येथे शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने फारुकवर गोळी झाडली.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मुफ्ती कैसर फारूक शनिवारी एका मशिदीपासून पायी चालत चालला होता. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून गोळी झाडली. गोळी लागताच कैसर जागीच कोसळला.

हेही वाचा- ईदच्या मिरवणुकीत झालेल्या आत्मघातकी स्फोटामागे ‘रॉ’चा हात? पाकिस्तानचे भारतावर गंभीर आरोप

मुफ्ती कैसर फारूक हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. शनिवारी कराचीमध्ये अज्ञात व्यक्तीने फारूक याच्यावर गोळी झाडून हत्या केली, असं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. या हल्ल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची पुष्टी ‘लोकसत्ता’ करत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, शनिवारी समनाबाद भागातील एका धार्मिक स्थळाजवळ ३० वर्षीय कैसर फारूक याला गोळ्या घातल्या. पाठीत गोळी लागल्यानंतर फारुखला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तेथे उपचारादरम्यान फारूकचा मृत्यू झाला.