Narendra Modi On Operation Sindoor : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ मे) आदमपूर हवाई एअरबेसवर जाऊन भारतीय जवानांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांचं कौतुक केलं. तसेच ‘भारत माता की जय…या घोषणेची ताकद जगाने पाहिली, जेव्हा आपल्या बहिणींचं सिंदूर हिसकावून घेतलं गेलं, तेव्हा दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना मारलं, असं म्हणत भारत बुद्धांची देखील धरती आणि गुरु गोविंद सिंह यांची देखील धरती आहे’, असं भाष्य पंतप्रधान मोदी यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“भारत माता की जय…या घोषणेची ताकद नुकतीच जगाने पाहिली. ही फक्त घोषणा नाही, तर देशातील प्रत्येक जवानांची एक शपथ आहे. जे जवान भारत मातेच्या सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी जीवाची बाजी लावतात, त्या प्रत्येक सैनिकाची ही शपथ आहे. देशातील प्रत्येक नागरिकांचा हा आवाज आहे. भारत माता की जय…हा आवाज मैदानात देखील घुमतो आणि ‘मिशन’मध्ये देखील घुमतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
“भारताचे सैनिक जेव्हा भारत माता की जय बोलतात, तेव्हा दुश्मनांचा थरकाप उडतो. जेव्हा आपलं मिसाईल निशान्यावर पोहोचतं तेव्हा दुश्मनांना देखील भारत माता की जय ही घोषणा ऐकायला जाते. जेव्हा आमची सेना न्यूक्लिअर बॉमच्या धमकीची हवा काढतात, तेव्हा आकाशापासून ते पातळापर्यंत एकच आवाज घुमतो तो म्हणजे भारत माता की जय…, भारतीय जवानांनी सर्व भारतीयांची मान उंचावली आहे”, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
“आज सकाळीच मी आपल्याला भेटायला आणि दर्शनासाठी आलो. जेव्हा वीरांच्या दर्शनाचा योग येतो, तेव्हा जीवन धन्य होतं. आज मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे. येणाऱ्या पिढीसाठी आपले जवान प्रेरणा आहेत. मी देशातील जवानांना सलाम करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे कोणतं साध अभियान नाही, तर निर्णायक क्षमताचं त्रिवेणी आहे. भारत बुद्धांची देखील धरती आहे आणि गुरु गोविंद सिंह यांची देखील धरती आहे. गुरु गोविंद सिंहजी यांनी म्हटलं होतं की, सवा लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं, आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणं ही आपली परंपरा आहे. जेव्हा आपल्या बहिणी आणि मुलींचं सिंदूर हिसकावून घेतलं गेलं, तेव्हा आपण दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून त्यांचे पंख छाटले”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.