जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर (टीओबी) गोळीबार केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘अमित शाह दुसऱ्यांदा गृहमंत्री झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हल्ले वाढले असून देशातील कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्र्यांपासून धोका आहे’, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत काय म्हणाले?

“जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका बसवर हल्ला केला, त्यामध्ये १० लोक ठार झाले. त्यानंतर सातत्याने जम्मू काश्मीरमध्ये हल्ले सुरु आहेत. आजही बातमी आली की, डोडा जिल्ह्यात लष्कराच्या तळावर हल्ला केला. आता एकीकडे ३७० कलम रद्द केल्याचा डंका अमित शाह वाजवत आहेत. मात्र, तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदलेली दिसत नाही. काश्मिरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत, हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. आता अमित शाह यांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपद दिल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार वाढला आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत दहशतवादी हल्ल्याची तिसरी घटना; डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार

“मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. आमचं म्हणणं आहे की, अमित शाह हे गृहमंत्रीपदाचा वापर हा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी करत नाहीत. ते आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी याचा वापर करतात. ते विरोधकांना संपवू शकतात, पण दहशतवाद्यांना संपवू शकत नाहीत. भष्ट्राचाऱ्यांना आपल्या पक्षात घेतात, पण काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाही. नरेंद्र मोदींनी असे गृहमंत्री पुन्हा एकदा देशाच्या छातीवर बसवून या देशातील शहिदांचा अपमान केला आहे. कायदा सुव्यवस्थेला धोका कोणापासून असेल तर गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून आहे. कारण ते कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विचार न करता ते फक्त राजकीय विचार करतात. त्यामुळे जेव्हापासून अमित शाह गृहमंत्री झाले तेव्हापासून जम्मू-काश्मीर आणि मणिपूर अशांत आहे. यावरून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधान परिषदेच्या जागांबाबत काय म्हणाले?

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊतांनी नाना पटोले यांना टोला लगावला. ते म्हणाले, “नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत. आमची अपेक्षा आहे की, ते आणखी मोठे नेते व्हावेत. चार विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत. त्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ ४० वर्ष शिवसेना ठाकरे गट जिंकत आहे. त्यामुळे मुंबई पदवीधर हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे चर्चेचा विषय येत नाही. नाशिकच्या जागेबाबत तशी चर्चा करण्याची गरज नव्हती. आता कोकणची जागा काँग्रेसला देण्यात येत आहे. यासंदर्भात आमची चर्चा झाली असून यामध्ये नाना पटोलेही होते. आम्ही कोकणातील उमेदवारी माघारी घेत आहोत आणि काँग्रेस नाशिकची उमेदवारी माघारी घेईल”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.